प्रकल्पासाठी जागा होऊ न शकल्याने रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग प्रकल्पाला मंजूरी मिळू शकलेली नाही. पण तरीही राज्यसरकारच्या उद्योग विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा परीसरात बल्क ड्रग पार्कची उभारणी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अलिबाग येथे दिली. ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर उपस्थित होते.
हेही वाचा- उल्हासनगरात पुन्हा अभय योजना जाहीर; ‘या’ कालावधीत करभरणा केल्यास थकबाकीवरील शास्ती होणार माफ
रोहा आणि मुरुड तालुक्यात केंद्र सरकारचा बल्क ड्रग पार्क प्रकल्प प्रस्तावित होता. त्यासाठी भुसंपादन प्रक्रीया सुरु होती. पण अपेक्षित असलेले भुसंपादन पूर्ण होऊ शकलेले नाही. तांत्रिक अडचणी होत्या. या अडचणींची मी माहिती घेतली आहे. मुरुड मधील बऱ्याचश्या जागा आजही नवाबांच्या नावावर, त्या जांगावर कुळ लागले आहेत. त्यामुळे भुसंपादनात अडचणी निर्माण होत आहेत. कुळांचे प्रश्न सोडवून, चांगला दर देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.
हेही वाचा- चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
जिल्ह्यात औद्योगिकारणासाठी यापुर्वी संपादीत केलेल्या जागांचा आढावा घेणार असून ज्या जागा उद्योजकांनी घेतल्या आहेत. पण प्रकल्प उभारलेला नाही, अशा जागा कायद्याच्या चाकोरीत बसून ताब्यात घेण्याची कारवाई करणार आहोत. त्याचबरोबर एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या पण उद्योग सुरु न झालेल्या राज्यभरातील जागांचा आढावा घेणार असून, या ठिकाणी उद्योग का नाही आले याच्या कारणांचा शोध घेतला जाईल, त्या ठिकाणी नवे उद्योग कसे येतील याचे प्रयत्न आगामी काळात राज्यसरकारच्या माध्यमातून केला जाईल. वेदांता प्रकल्प गेला असला तरी लवकरच त्याहून मोठा प्रकल्प राज्यात येईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.