आधुनिक युगात विज्ञान, तंत्रज्ञानासह उद्योग जगतात कितीही क्रांती झाली असली तरी मनुष्य स्वभाव चांगला असेल तर स्थिर मूल्य निर्मितीबरोबर शाश्वत सुधारणा करणे सहज शक्य होते. बांधकाम व्यवसायातील उद्योजकांनी नेहमी परिसरातील पर्यावरणाचा जाणीवपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी केले.
येथे डॉ. मुंजे इन्स्टिटय़ूटच्या वतीने ‘उद्योग जगत आणि शाश्वत निर्मिती मूल्य’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी कुलकर्णी बोलत होते. त्यांनी या प्रसंगी विविध राष्ट्रातील, राज्यातील निर्मिती मूल्य, पर्यावरण, उद्योग याबाबत उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुणे विनय सहस्रबुद्धे यांनी भारतीय संस्कृतीने विविध क्षेत्रात सर्व जगात नावलौकिक प्राप्त केला असल्याचे नमूद केले. निरनिराळ्या राष्ट्रांचे र्सवकष धोरण, आचार-विचार यांची योग्य वेळी देवाण-घेवाण केली तर दोन राष्ट्रांमधील परस्पर संबंध दृढ होण्यास मदत होते, असे विचार त्यांनी मांडले. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष दिलीप बेलगावकर, प्रा. प्रकाश पाठक व संचालक अशोक अग्रवाल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील प्राचार्य, विद्यार्थिनी तसेच नगरसेविका सीमा हिरे, महेश दाबक, आशुतोष रहाळकर, डॉ. प्रा. शेखर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रा. महेश कुलकर्णी आणि प्रा. हर्षदा औरंगाबादकर यांनी केले.

Story img Loader