पेणच्या गणपती व्यवसायाचे विस्कळीत स्वरूप दूर करण्यासाठी राबविण्यात येणारी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर बारगळली आहे. पेण मूर्तिकारांकडून योजनेला अपेक्षित सहकार्य मि़ळत नसल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होण्याआधीच बंद पडला आहे.
केंद्र सरकारच्या सूक्ष्म आणि लघु समूह विकास कार्यक्रमांतर्गत पेण येथील गणपती कारागिरांसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला केंद्र सरकारने २००९ साली तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाचे विस्कळीत स्वरूप दूर करून या व्यवसायाला ऑर्गनाईज स्वरूप देणे हा या योजनेमागचा उद्देश होता. शिवाय पेणच्या गणेश मूर्तीच् जागतिक पातळीवर ब्रॅण्डिंग करण्याचे प्रयत्न या योजनेतून केले जाणार होते. मात्र मूर्तिकारांकडून मिळणाऱ्या अत्यल्प प्रतिसादामुळे ही योजना अखेर बारगळली आहे.
राज्यातील १० ग्रामोद्योगांची गुणवत्ता विकसित करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम योजना राबविण्यात आली. यात पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाचाही समावेश होता. या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योजिकता विकास केंद्राने पेण तालुक्यातील पेण मूर्तीकलेचा निदान उपयोगी अभ्यास अहवाल तयार केला. पेणमधील २५० ते ३०० गणपती मूर्तिकारांना योजनेची माहिती सांगून अहवाल दाखवण्यात आला. पेणच्या गणपती मूर्तीची गुणवत्ता वाढावी, तसेच मूतीर्ंना ट्रेड मार्क मिळावा म्हणून प्रयत्नदेखील सुरू झाले. क्षमता वृद्धी कार्यक्रमांतर्गत पेणच्या मूर्तिकारांना तांत्रिक आणि उद्योजकता प्रशिक्षणही देण्यात आले. या योजनेअंतर्गत देशभरातील यशस्वी झालेल्या क्लस्टरना भेट देऊन पाहणी करण्याचा उपक्रमही राबविला गेला. केरळमध्ये जाऊन मूर्तिकार संघटनांच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शनही घेतले. त्यानंतरच्या टप्प्यात पेण मूर्तिकार संघटनांना स्वतची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करण्यास सांगण्यात आले. पण पेणच्या मूर्तिकारांनी याकडे दुर्लक्ष केले आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भवितव्य अडचणीत आले.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाला आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात कंपनीची स्थापना करणे, कंपनीसाठी जागा विकत घेणे आणि त्यानंतर सामायिक सुविधा केंद्रांची उभारणी करणे गरजेचे आहे. यासाठी कंपनीमधील भागीदारांनी १० टक्के निधी उभा करायचा आहे, तर उर्वरित ९० टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे. बँक ऑफ इंडियाने या प्रकल्पासाठी लागणाऱ्या १० टक्के रकमेसाठी कर्जपुरवठा करण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. मात्र तरीही पेणच्या मूर्तिकारांनी या प्रकल्पात फारसे स्वारस्य दाखवलेले नाही. अद्याप कंपनी स्थापन केली नाही अथवा प्रकल्पासाठी असणारी जागादेखील निवडलेली नाही.
सामायिक सुविधा केंद्र सुरू झाल्यास पेणच्या गणेश मूर्तीचे सामायिक उत्पादन सुरू होऊ शकणार आहे. शिवाय गुणवत्ता केंद्र बिजनेस डेव्हलपमेंट सेंटर, तांत्रिक प्रशिक्षण केंद्र या सर्व सुविधा एकाच छत्राखाली येऊ शकणार आहेत.
केंद्र सरकारच्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत राज्यभरातून निवडण्यात आलेले इतर नऊ प्रकल्प मार्गी लागले आहेत. यात रत्नागिरीच्या आंबा प्रोसेसिंग, सिंधुदुर्गातील काजू प्रक्रिया प्रकल्प, तर कोल्हापूरमधील चर्मकला आणि चांदीकलेचा समावेश आहे. राज्यात क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत रखडणारा पेणचा गणेश मूर्तिकला हा एकमेव प्रकल्प ठरला आहे. प्रकल्प मार्गी लागावा यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने खूप प्रयत्न केले. मात्र गणपती मूर्तिकार सुरुवातीला लागणारी १० टक्के लोकवर्गणी गोळा करू शकले नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचे गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी सांगितले. आता ही योजना बारगळली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
पेणच्या गणपतींची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना बारगळली
पेणच्या गणपती व्यवसायाचे विस्कळीत स्वरूप दूर करण्यासाठी राबविण्यात येणारी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर बारगळली आहे.
First published on: 13-08-2013 at 01:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ineffective cluster development scheme of ganesh business in pen