वसतिगृहात मिळणाऱ्या निकृष्ट व दर्जाहीन भोजनाविरुद्ध एकवटलेल्या विद्यार्थ्यांनी अखेर या भोजनावर बहिष्काराचे अस्त्र उगारले. शनिवारी या भोजनात अळ्या व किडे आढळल्याने विद्यार्थ्यांच्या संतापात भरच पडली. सोमवारी (दि. १५) या प्रश्नी मार्ग काढण्याची ग्वाही प्राचार्यानी दिल्यानंतर विद्यार्थी शांत झाले.
येथील शासकीय तंत्रनिकेतनाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांची ही कैफियत आहे. शनिवारी या विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे जेवणावर बहिष्काराचा निर्णय घेतला. या वेळी बाहेरगावी गेलेल्या प्राचार्याशी मोबाईलवर संपर्क साधून लक्ष वेधले. सोमवारी यावर काही तोडगा काढला जाईल, असे आश्वासन प्राचार्यानी दिले. या बाबत काय कारवाई होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
या तंत्रनिकेतनातील मुलांच्या वसतिगृहात १५० मुले, तर मुलींच्या वसतिगृहात ५० मुली राहतात. येथील कंत्राटदाराकडून मिळणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. विद्यार्थ्यांना रविवारी गोड जेवण, तर दररोज दोन भाज्या, भात वरण देण्याचे करारात बंधनकारक आहे. मात्र, कंत्राटदार याकडे लक्ष न घालता निकृष्ट जेवण देतो. भात व वरणात वारंवार अळ्या निघतात. विद्यार्थ्यांनी तक्रार केली, तर कंत्राटदार तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बघून घेतो. तुम्ही येथे कसे राहता’ अशा धमक्या देत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.