सोलापूर : सोलापूरच्या बहुप्रतीक्षित विमानसेवेचा लांबलेला मुहूर्त लवकरच ठरणार असून, त्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक सर्व बाबींची पूर्तता होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
म्हणाले, की सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी धार्मिक, ऐतिहासिक, कृषी व जलपर्यटन विकास पूर्णत्वास घेण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची पावले पडत आहेत. या पर्यटन विकासासह स्थानिक उद्योग व्यवसायाला चालना मिळण्यासाठीच विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक सर्व बाबींची पूर्तता होत आली आहे. यानुसार येत्या महिनाभरात विमानसेवेला मुहूर्त लागण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानसेवेचे लोकार्पण झाले होते. प्रत्यक्षात भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) काही तांत्रिक परवाने मिळाले नव्हते. त्यांची पूर्तता करण्यात आली आहे. ‘फ्लाय-९१’ विमान कंपनीने मुंबई-सोलापूर-मुंबई आणि गोवा-सोलापूर-गोवा अशी विमानसेवा गेल्या २३ डिसेंबरपासून सुरू करण्याचे ठरविले होते. परंतु, आणखी काही किरकोळ तांत्रिक बाबींची पूर्तता करणे आवश्यक असल्याने विमानसेवेचा मुहूर्त लांबला आहे. विमानतळावर १६५ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरणासह विविध दुरुस्ती कामे झाली आहेत. विमानतळावर विमानासाठी इंधन उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्याचीही पूर्तता लवकरच होत असून, नागपूरच्या संबंधित यंत्रणेकडून आवश्यक परवानगी घेतली जात आहे. हे सर्व झाल्यावर सोलापूरची विमानसेवा सुरू होईल असे आशीर्वाद यांनी सांगितले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी (महसूल) अमृत नाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के हे उपस्थित होते.
हेही वाचा >>>‘अलमट्टी’ची उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा विरोध, फडणवीस (प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात)
विमानसेवेची बहुप्रतिक्षा
सोलापूरचे विमानतळ आदमासे सुमारे ३५० एकर क्षेत्रात आहे. भविष्यकाळाचा विचार करता जवळच बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळाची २००४ नंतर उभारणी सुरू झाली होती. त्यासाठी सुमारे दोन हजार एकर जमीन संपादितही झाली होती. परंतु, पुढे फारशी प्रगती झाली नाही. त्यामुळे जुन्या छोटेखानी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय झाला. येथून २००८ साली खासगी विमानसेवा सुरूही झाली. परंतु, पुढे ती थोड्याच कालावधीत बंद पडली. या मागे विमानतळालगत सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या ९० मीटर उंच चिमणीचे कारण पुढे आले. हे अडथळे दूर करत विमानसेवा सुरू करण्याच्या घोषणा गेल्या १६ वर्षांत अनेकदा झाल्या, मात्र ही सेवा धावपट्टीवरच राहिली. १५ जून २०२३ रोजी अडथळा असलेली चिमणी पाडण्यात आल्यानंतर विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा होती. त्यात पुन्हा तांत्रिक अडचणी आल्या. आता महायुती सरकारने मनावर घेत हा विषय पूर्णत्वाकडे नेला आहे. विमानतळाचे नूतनीकरण झाले. गेल्या २९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण झाले होते. प्रत्यक्षात विमानसेवेची सोलापूरकरांना बहुप्रतिक्षा आहे.