ग्रामीण भारतासाठी राबविलेल्या ‘कनेक्टिंग व्हिलेज’ योजनेंतर्गत राज्यातील ग्रामपंचायती ‘ऑप्टीकल फायबर’ने जोडण्याच्या उपक्रमाचा लवकरच श्रीगणेशा होत आहे. या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीत ग्रामीण भागही समाविष्ट होईल. त्याचाच भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती आगामी दोन वर्षांत तीन हजार किलोमीटरच्या फायबर ऑप्टीक नेटवर्कने जोडल्या जाणार आहेत. शासनाच्या सर्व प्रकारच्या सेवा ग्राम पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी त्या अंतर्गत ग्राम सेवा केंद्र सुरू करण्याचे प्रयोजन आहे.
देशातील प्रत्येक खेडे दूरसंचार आणि ‘ब्रॉडबँड’ ‘कनेक्टिव्हीटी’ने जोडण्यासाठी सरकारने निर्माण केलेल्या निधीत दूरसंचार कंपन्यांना योगदान देणे बंधनकारक होते. या योजनेनुसार जमा झालेल्या निधीतून ग्रामीण भारतासाठीच्या या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. ग्रामीण आरोग्य केंद्र, पशू वैद्यकीय केंद्र, वन विभागाचे कार्यालय, पोलीस ठाणे, तलाठी कार्यालय, टपाल सुविधेसह राष्ट्रीयकृत आणि सरकारी बँकांचेही जाळे ग्रामीण भागात असते. शासकीय कामासाठी लागणारे विविध दाखले, प्रमाणपत्र आदी स्वरूपाच्या सुविधा नागरिकांना वेळेत उपलब्ध होत नाहीत. हीच गरज ओळखून शासन ग्राम सेवा केंद्र सुरू करणार आहे. या केंद्रामार्फत नळ जोडणी अर्ज, रहिवासी दाखला, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र, जन्म-मृत्यूचा दाखला, चांगल्या वर्तणुकीचा दाखला, थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अशा स्वरूपाची जवळपास १४ प्रमाणपत्रे दिली जातील. या शिवाय, केंद्रामार्फत ग्रामपंचायतीच्या कामात आणखी पारदर्शकता येऊन नागरिकांना मुदतीच्या आत दाखले व प्रमाणपत्र देण्याचे शासनाचे उद्दीष्ठय़े असून ग्रामस्थांनी गैरसोय टळून वेळेचीही बचत होईल. ग्राम सेवा केंद्राच्या माध्यमातून २०० हून अधिक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या पाश्र्वभूमीवर, सर्व ग्रामपंचायत स्तरावर माहितीच्या महाजालाची यंत्रणा पोहोचवून जिल्हा परिषदेचे ग्राम सेवा केंद्र पूर्ण क्षमतेने चालु शकणार आहे. पुढील टप्प्यात शासनाच्या सर्व सेवा ग्रामपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे ग्राम सेवा केंद्र सुरू केले जाईल. या सेवा गावातच मिळू लागल्यास ग्रामस्थांचा वेळ, पैशांचा अपव्यय आणि मनस्तापातून मुक्तता होईल. गावक ऱ्यांना इंटरनेटमुळे बाजारभाव, हवामानाचा अंदाज याबाबतची माहितीही गावातच मिळू शकेल. या ग्रामसेवा केंद्राशी जिल्ह्यातील सर्वच गावातील ग्रामस्थांचा संबंध येणार आहे. या बरोबर सर्वच ग्रामस्थ जगाशी जोडले जाणार आहेत.
विविध सेवांसाठी ‘सव्र्हिस प्लस’
दिल्ली येथील ‘एनआयसी’ने केंद्र सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयासाठी देशातील जनतेला त्यांच्या गावातच विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘सव्र्हिस प्लस’ ही संगणकीय आज्ञावली तयार केली आहे. नाशिक जिल्ह्यातील कामासाठी सुमारे ५० कोटींचा निधी ‘नॅशनल ऑप्टीकल फायबर नेटवर्क’साठी उपलब्ध करून दिल्याची माहिती खा. समीर भुजबळ यांनी दिली. लवकरच या कामास सुरूवात होत असून २०१६ पर्यंत ते पूर्ण होईल.
ग्रामपंचायती माहिती तंत्रज्ञानाची क्रांती अनुभवणार
ग्रामीण भारतासाठी राबविलेल्या ‘कनेक्टिंग व्हिलेज’ योजनेंतर्गत राज्यातील ग्रामपंचायती ‘ऑप्टीकल फायबर’ने जोडण्याच्या उपक्रमाचा लवकरच श्रीगणेशा होत आहे.
First published on: 12-10-2013 at 12:07 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information technology revolution experiencing the gram panchayat