N. R. Narayana Murthy : ‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांना अनेकजण आपला आदर्श मानतात. अनेकजण नारायण मूर्ती यांना फॉलो करतात, तर अनेकांचं त्यांच्या सारखं बनण्याचं स्वप्न असतं किंवा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न अनेकजण करत असतात. आता एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर नारायण मूर्ती यांनी दिलेल्या उत्तराची मोठी चर्चा रंगली आहे.
नारायण मूर्ती हे एका शाळेत कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी एका १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने नारायण मूर्ती यांना असा प्रश्न विचारला की, मला तुमच्यासारखं बनण्यासाठी काय करावं लागेल? या प्रश्नाचं उत्तर देताना नारायण मूर्ती यांनी म्हटलं की, “मला वाटतं की तू माझ्यासारखं व्हावं असं मला वाटत नाही. माझ्यापेक्षा तू राष्ट्राच्या हितासाठी चांगलं काहीतरी व्हावं अशी माझी इच्छा आहे.” दरम्यान, यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे.
हेही वाचा : Air India : एअर इंडियाने प्रवाशांसाठी आता आणली ‘ही’ नवी सुविधा; कसा घेता येणार लाभ?
नारायण मूर्ती यांनी यावेळी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की, “आपल्या अपयशाची जबाबदारी आपणच घ्यायला हवी. तसेच अभिमानाचे क्षण मित्रांबरोबर शेअर केले पाहिजेत. निःस्वार्थपणे एखादी गोष्ट कोणाबरोबर शेअर केल्यामुळे आनंद मिळतो.”
याबाबत त्यांनी एक त्यांचा अनुभवही सांगितला. आपल्या सुरवातीच्या दिवसांचा उल्लेख करत ते म्हणाले, “त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. मग शिष्यवृत्तीच्या पैशामधून त्यांनी एक ड्रेस विकत घेतला. मात्र, आईने तो ड्रेस भावाला द्यायला सांगितला. पण मी घेतलेला ड्रेस भावाला द्यायला आधी मी विरोध केला. पण दुसऱ्या दिवशी मी तो ड्रेस भावाला दिला. त्यामुळे मला आणि त्यालाही खूप आनंद झाला.”
याबरोबरच माझ्या वडिलांनी वेळापत्रकाच्या माध्यमातून मला वेळेचं महत्त्व अनेकदा समजून सांगितलं. वडिलांनी लावलेल्या शिस्तीमुळे मला खूप फायदा झाला. त्यामुळे आज प्रत्येक जणाने एक जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी काम केलं पाहिजे. हे काम राष्ट्राच्या हिताचं असलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
“स्वत:चा मार्ग स्वत:चा तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरुण विद्यार्थ्यांनी नेतृत्व, औदार्य, शिस्त, जबाबदार नागरिक या मूल्यांचा अवलंब करत आपण प्रत्येकाने एक स्वतःचा वेगळा मार्ग तयार करत प्रत्येक व्यक्तीने जबाबदार नागरिक बनलं पाहिजे. राष्ट्राच्या हितासाठी देखील काम केलं पाहिजे”, असंही यावेळी ‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी म्हटलं आहे.