पाचगणी गिरीस्थान पालिकेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांच्यावर आज(बुधवार) एका व्यक्तीने शाई फेकली. यामुळे जिल्ह्यातील पालिकांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. आज जिल्ह्यातील सर्व पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत काम बंद आंदोलन केले.पाचगणी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी गिरीश दापकेकर सकाळी बाजारातील स्वच्छतेबाबत पाहणी करत असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यात अनमोल कांबळे याच्याविरोधात शासकीय कामांमध्ये अडथळा आणून हल्ला केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
तर पोलीस पथक कांबळेच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. याबाबत माहिती समजताच महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, वाईचे मुख्याधिकारी किरण मोरे यांच्यासह पांचगणी शहर व परिसरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक हे पोलीस ठाण्यात दाखल झाले व या घटनेचा जाहीर निषेध करीत मुख्याधिकारी यांना दिलासा दिला
आंदोलनामुळे वेण्णा लेक आणि अन्य पर्यटनस्थळे बंद –
यामुळे पाचगणी, महाबळेश्वर नगरपालिका कर्मचारी संघटना आक्रमक झाली असून या घटनेच्या निषेधार्थ कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे वेण्णा लेक आणि त्याच बरोबर इतर पर्यटन स्थळे आज बंद पडली . मात्र शाईफेक नेमक्या कोणत्या कारणातून फेकली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. पाचगणी व महाबळेश्वर पालिका कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन दिले व संबंधितावर कारवाईची मागणी केली.
कोणीही असू द्या कडक कारवाई होणार – जिल्हाधिकारी जयवंशी
“पांचगणी गिरीस्थान पालिकेच्या मुख्याधिकऱ्यांच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे. तो चुकीचा आहे. मी माहिती घेतली आहे. पोलिसांना तशा सुचना दिल्या आहेत. कोणीही असू द्या, मी त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.” अशी माहिती साताराचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.