कोळसा आणि पाणी टंचाईमुळे महाराष्ट्रासह देशभरातील ऊर्जानिर्मिती केंद्रांवर प्रश्नचिन्ह लागले असताना अमरावतीच्या अतिमागास मेळघाट प्रदेशातील धारणी तालुक्यात निसर्ग संवर्धन सोसायटीने मुठवा समुदाय विकास केंद्रात पवन-सौर मिश्र ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवठय़ाचा अत्यंत अभिनव प्रयोग केला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या अतिदुर्गम हरिसाल गावानजीकच्या बोरी-कोठा मार्गावरील केंद्राने राबविलेल्या या प्रयोगाने महागडय़ा आणि दिवसेंदिवस लुप्त होत चाललेल्या पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराला भविष्यात पवन आणि सौर ऊर्जा याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे सरकारला दाखवून दिले आहे.
गेल्या २२ वर्षांपासून निसर्ग संवर्धन संस्था सातपुडा फाऊंडेशनच्या सहकार्याने मेळघाटातील आदिवासी विकासासाठी काम करीत असून अतिमागास आदिवासींच्या उत्थानासाठी वेगवेगळे पर्यावरण पूरक उपक्रम या स्वयंसेवी संस्थेने यशस्वी करून दाखविले आहेत. यातील ऊर्जा स्वयंसिद्धतेचा हा प्रयोग देशातील उल्लेखनीय प्रयोग म्हणून नोंदला गेला आहे. २००८ साली मुठवा केंद्रात बायोडिझेलवर जनरेटर चालविण्याचा पहिला प्रयोग करण्यात आला. यातून केंद्रातील काही दिवे जळत राहिले. यानंतर २०११ साली बायोडिझेलच्या सोबतीने सौर ऊर्जेचा प्रकल्प राबविण्यात आला. या ठिकाणी सोलर कुकर आणि ५०० लिटर गरम पाण्याची सोय त्यामुळे झाली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक गावांमध्ये नियमित वीजपुरवठा अजूनही केला जात नाही. दुर्गम भाग असल्याने वीज वाहिन्या टाकण्यात असंख्य अडचणी येत आहेत. जंगल परिसरात विजेचे खांब टाकून लाइन जोडणी करणे वन्यजीवांच्या दृष्टीने अतिशय धोक्याचे तर आहेच शिवाय अनेक तांत्रिक तसेच व्यावहारिक अडचणींमुळे गावांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. अनेक मूळ गावे आणि पुनर्वसित गावेसुद्धा रात्रीच्या वेळी अंधारात राहताना दिसतात. काही गावांमध्ये सौर ऊर्जेची सोय करून देण्यात आली होती परंतु, प्लेट्स चोरी गेल्याने ती देखील बंद आहे. काही गावांमध्ये रात्रीच्या वेळी एखाद दुसरा दिवा जळताना दिसतो.
पाणी नाही, वीज नाही, जाण्याची सोय नाही अशा अत्यंत कठीण परिस्थितीत सुरू झालेल्या बोरी कोठा मार्गावरील समुदाय विकास केंद्रात आता खऱ्या अर्थाने वीज आली असून शनिवारी रात्रीच्या समारंभाच्या वेळ संपूर्ण केंद्र लख्ख प्रकाशाने अक्षरश: उजळले तेव्हा उपस्थित गरीब आदिवासींच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले. यापूर्वी बायोडिझेल आणि सौर ऊर्जेवरून बॅटरीज चार्ज केल्यानंतरही एलसीडी प्रोजेक्टर किंवा टीव्ही, फ्रीज चालविणे शक्य नव्हते. विशेषत: मान्सूनच्या काळात खूपच अडचणी येत. त्यामुळे ऊर्जातज्ज्ञ प्रो. निशिकांत काळे यांनी सौर ऊर्जेला पवन ऊर्जेची जोड देऊन पवन-सौर ऊर्जा निर्मितीचा संयुक्त प्रकल्प उभारणीची संकल्पना मांडली. पुण्याच्या लीनवे एनर्जी लिमिटेड या कंपनीने एक छोटे विंड टर्बाईन युनिट संस्थेला उपलब्ध करून दिले. तीन ब्लेडचे युनिट ५०० वॅट आणि सौर ऊर्जेचे युनिट ५०० वॅट अशी एकूण १ किलोवॅट संयुक्त ऊर्जा निर्माण करू लागले असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सरकारी विजेचा वापर न करता स्वयंसिद्धतेने प्रकाश देणारे पहिले केंद्र म्हणून मुठवाची नोंद झाली आहे. यासाठी इंडसइंड बँकेचे नागपूर शाखेचे व्यवस्थापक संतोषकुमार झा यांचेही सहकार्य लाभले, असे सातपुडा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर रिठे आणि प्रो. काळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा