छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील बाहुबलींनी घातलेले घोळ लक्षात घेऊन पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या दोन वर्षांच्या निधीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसे आदेशही नियोजन विभागाने काढले आहेत. आमदार सुरेश धस यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कामाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे या चौकशी समितीच्या अहवालात काय पुढे येते याकडे लक्ष असणार आहे.
या चौकशी समितीमध्ये तीन अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर, या समितीचे अध्यक्ष असून मुंबई अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबईचे अपर संचालक म का भांगे, हे सदस्य तर जिल्हा नियोजन अधिकारी, जालना सुनिल सुर्यवंशी हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या योजनांमध्ये २०२४-२५ मध्ये कामांना दिलेल्या प्रशासकीय मंजुरी आणि २०२३ – २४ मधील सर्व कामांची स्थिती, त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश, निधी वितरण व झालेली कामे याची चौकशी आठवाडाभराच्या आत करुन तो अहवाल सादर करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. अनेकवेळा निधी वितरित करताना परळीहून दबाव येत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे ही चौकशी समिती नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी ७३ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही आमदार सुरेश धस यांनी केला होता. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कामाची स्थिती, दहा लाख रुपयांचे तुकडे पाडून केलेल्या कामांचा तपासही या निमित्ताने होईल असे सांगण्यात येत आहे.