अण्णा भाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहाराची व्याप्ती ३०० कोटी रुपयांच्या आसपास असून, अन्य महामंडळांतही गैरव्यवहार झालेले असू शकतात. त्यामुळे सर्व महामंडळांची चौकशी केली जाईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी येथे सांगितले. विविध विभागांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अण्णा भाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहाराचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर १८ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. सीआयडी चौकशी सुरू आहे. त्यामुळे या गैरव्यवहारात कितीही मोठी व्यक्ती सहभागी असू द्या, त्याला बेडय़ा ठोकल्या जातील, या शब्दांत कांबळे यांनी कारवाईचे स्वरूप स्पष्ट केले. अण्णा भाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहारात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असल्याबाबतची माहिती माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी नुकतीच दिली. या पाश्र्वभूमीवर ढोबळे यांच्या मताशी सहमत आहात काय, असे विचारले असता कांबळे म्हणाले, की एवढे दिवस ढोबळे त्यांच्याबरोबरच तर होते. त्यामुळे त्यांना आता यावर बोलण्याचा काय अधिकार आहे?
महामंडळातील या गैरव्यवहाराची व्याप्ती फार मोठी आहे. अनेक अधिकारी-कर्मचारी यात सहभागी झाले होते, मात्र ज्या अधिकाऱ्याने गैरव्यवहारास नकार देत काही लेखी पत्रव्यवहार केला असल्यास वा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली असल्यास त्याची प्रत दिल्यास त्यांची चौकशीतून सुटका होऊ शकेल, असेही ते म्हणाले. केवळ एकाच महामंडळात गैरव्यवहार झाला, यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे अन्य महामंडळांचीही चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. महामंडळातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती केली जाईल, असेही ते म्हणाले.

Story img Loader