लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी महापालिकेत येऊन नागरी प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांबरोबरच पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. सांगलीकरांना येत्या पावसाळी हंगामाचा त्रास होऊ नये यासाठी शहरातील सर्वच रस्ते तातडीने दुरुस्त करावेत अशी सूचना काँग्रेस नेते मदन पाटील यांनी महापालिकेत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बठकीत केली. यावेळी आयुक्त अजिज कारचे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी या वेळी उपस्थित होते. महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, स्थायी समितीचे सभापती राजेश नाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकारीही हजर होते.
मदन पाटील यांनी या वेळी काही ठेकेदारांनाही बोलावून घेतले. अधिकाऱ्यांसमोरच त्यांनी अडचणी विचारल्या. कामे मार्गी लागत नसतील तर पदावर तरी का राहता? असा सवाल त्यांनी केला. शहरात ड्रेनेज आणि केबल कामासाठी झालेल्या खोदाईमुळे रस्ते उखडले गेले आहेत. नागरिकांना त्याच्या होत असलेल्या त्रासाकडे  पाटील यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, यापुढे ड्रेनेजसाठी कोणत्याही परिस्थितीत खोदाई नको. त्याऐवजी झालेल्या कामाच्या ठिकाणी रस्ते पूर्ववत करणे आणि पॅचवर्कच्या कामाला प्राधान्य द्यावे. जेणेकरून पावसाळ्यापूर्वी कोणत्याही स्थितीत रस्ते सुस्थितीत येतील. या कामाची सुरूवात येत्या सोमवारी झालीच पाहिजे. केबलसाठी कंपन्यानी महापालिकेकडे जमा केलेला निधी त्याच खोदाईच्या दुरुस्तीसाठी खर्च होईल याकडे लक्ष द्या. लोकांच्या नाराजीची दखल घ्या. कामे कशात अडली आहेत ते सांगा. शेरीनाला योजनेचे काम मार्गी का लागत नाही? ड्रेनेजच्या सुधारित कामांचा प्रस्ताव तातडीने तयार करा अशा सूचना त्यांनी दिल्या.

Story img Loader