जागेची नुकसान भरपाई देत असताना सर्व नियम पायदळी तुडवित १ कोटी ६० लाख रुपये देण्यात आले असल्याचे उघडकीस आले असून याची चौकशी करून येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले असल्याची माहिती नगरसेवक गौतम पवार यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. नियमबाह्य कामकाज करणाऱ्या आयुक्त अजिज कारचे यांना निलंबित करून त्यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
माधवनगर रोडवरील एका उपनगरात हणमंत पवार यांच्या भूखंडातील काही जागा रस्त्यासाठी महापालिकेने ताब्यात घेतली. हा जागा ताब्यात घेण्याचा प्रकार २००२ मध्ये झाला. या जागेची नुकसान भरपाई देत असताना मात्र नवीन कायद्याचा आधार घेत जागेची किंमत वाढविण्यात आली. या भरपाईपोटी आयुक्त कारचे यांनी  कांचन कांबळे महापौर असतानाच्या कालावधीत ऐन वेळच्या विषयात ठराव घुसडून १ कोटी ६० लाख रुपये अदा करण्यात आले. भरपाईच्या ४० टक्के ही रक्कम असून अद्याप ६० टक्के रक्कम देणे बाकी आहे. यासाठी जागा मालकाकडून एक साधा अर्ज लिहून घेण्यात आला.
याबाबत महसूलमंत्री खडसे यांच्याकडे तक्रार केली असता भूसंपादनाची भरपाई देत असताना कायद्याचे उल्लंघन झाल्याचे दिसत असल्याने याबाबत येत्या १५ दिवसांत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे नगरसेवक श्री. पवार यांनी सांगितले. तसेच आयुक्त कारचे हे नियमबाह्य काम करीत असल्याचा आरोप करीत ड्रेनेज योजनेच्या ठेकेदाराला बिल अदा करण्यासाठी इस्लामपूर येथे कागद मागवून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिका आर्थिक अडचणीत असतानाही नियमबाह्य पद्धतीने पैशाची उधळपट्टी होत असेल, तर अशा अधिका-याने अन्य बाबीमध्येही गैरव्यवहार केला असल्याचा संशय बळावला आहे. यामुळे अशा अधिका-यांना निलंबित करून त्यांच्या कारकीर्दीतील व्यवहाराची चौकशी होणे गरजेचे असल्याचेही श्री. पवार यांनी या वेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा