ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मोहीम उघडली असताना राष्ट्रवादीने मात्र राजीव यांची बाजू घेतली आहे. त्याचवेळी सरनाईक यांच्या आरोपावरून राजीव यांच्या विरोधात नगरविकास खात्याच्या सचिवाकडून चौकशी करण्याची घोषणा नगरविकास खात्याचे राज्यमंत्री राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत केली.
 ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांच्यात गेल्या काही माहिन्यांपासून वाद सुरू आहे. सरनाईक यांच्या विहंग गृहनिर्माण प्रकल्पासाठी अनाधिकृत नळजोडणी घेऊन पाणी चोरी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्याचवेळी त्यांच्या काही अन्य बांधकामावरही कारवाई करण्याची प्रक्रिया आयुक्तांनी सुरू केल्यावरून दोघांमध्ये गेले काही दिवस वाद सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर नगरविकास खात्याच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान सरनाईक यांनी पुन्हा एकदा पालिका आयुक्तांना लक्ष्य केले. राजीव यांनी पालिकेच्या आयुक्त निवासात अनियमित बांधकाम केले आहे. हे निवासस्थान वन जमिनीत येत असतानाही त्यात फेरफार करण्यात आले आहेत. तसेच निविदा न काढता ही काही कामे केल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. राजीव हे अन्य राज्यातील असून त्यांना महाराष्ट्रात शेतजमीन घेता येत नाही. तरीही त्यांनी ठाणे जिल्ह्यात नदीच्या किनारी १२ एकर जागेत फार्म हाऊस उभारल्याचा आरोपही केला. अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी यांना एक न्याय आणि राजीव यांना वेगळा न्याय कसा, असा सवाल त्यांनी केला.
आयुक्तांनी असून पाच वेळा परदेश दौरे केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर करवाई करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली. त्यावर नगरविकास विभागाचे प्रधान सचिव(दोन) यांच्या मार्फत या  आरोपांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी केली.     
सरनाईक विरुद्ध राजीव की आव्हाड?
राजीव आणि प्रताप सरनाईक या वादाला वास्तविक राष्ट्रवादीमधील अंतर्गत भांडणाचा मुख्य पदर आहे. पूर्वी राष्ट्रवादीत असलेले  प्रताप सरनाईक आता शिवसेनेचे आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे ठाण्यातील बडे प्रस्थ असलेले जितेंद्र आव्हाड हे त्यांचे कट्टर शत्रू मानले जातात. त्यामुळेच राजीव विरुद्ध सरनाईक या वादाला आव्हाड विरुद्ध सरनाईक असाही एक रंग आहे. त्यामुळेच काल, सोमवारी आव्हाड यांनी राजीव यांचे विधानसभेतच उघड समर्थन केले होते. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेतून राष्ट्रवादीत येऊन दाखल झालेल्या भास्कर जाधव यांनी राजीव यांची चौकशी लावल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत.

Story img Loader