अशोक तुपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमी कष्टाची अन् विनाजोखमीचे ऊस पीक हे हवामान बदलाचा मुकाबला करू शकणारे एकमेव पीक असा दावा कृषी शास्त्रज्ञ करीत असत. हा दावा खोटा ठरू लागला आहे. आता हवामानातील चढउतारानुसार उसावर कीड पडू लागली आहे. राज्यात यंदा करपासदृश तांबेरा आणि पांढऱ्या माशीच्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.

ऊस शेती म्हणजे कमी खर्चाची, कमी कष्टाची शेती. कीटकनाशके व बुरशीनाशकांची त्यावर फारशी फवारणी करावी लागत नाही. अशी ऊसशेतीची ओळख होती.  मात्र, ती आता कालबा झाली आहे. बदलत्या हवामानाबरोबर  गेल्या काही वर्षांत उसावर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाला आहे. तांबेरा हा कवकजन्य रोग हा बुरशीमुळे होत असतो. उसाच्या पानावर सुरुवातीला तांबडे ठिपके पडतात. नंतर ठिपक्यांचा आकार वाढत जातो. उसाच्या पानांचा भुगा झालेला आढळतो. उसाची पाने तांबडी पडून पानाच्या खालील बाजूस तांबूस पिटळी पडते. पाने खराब झाल्याने ऊस रोपांतील प्रकाश संश्लेषण प्रक्रिया खंडित होते. परिणामी उसाची वाढ खुंटते आणि उत्पादन घटते. उसावर तांबेरा रोग बुरशीमुळे पडतो. पिकात अन्नद्रव्यांची निर्मिती थांबते. याचा फटका ऊस वाढीला बसल्याने उत्पादन घटते. त्यामुळे ऊस पिकावरील रोग नियंत्रण करणे गरजेचे बनते. सध्या अनेक ठिकाणी उसाचे फड  खराब झाले आहेत. नगर, पुणे, लातूर, सांगली,कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद या जिल्ह्यात उसावर तांबेरा रोग पडला आहे. तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, नेवासे, शेवगाव, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी या भागात पांढरी माशी पडली आहे. पांढरी माशी उसाच्या पानांतील रस शोषण करीत असल्याने ऊस उत्पादकांची चिंता वाढली आहे. यंदा ऊस उत्पादनात काही अंशी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यंदा अनेक जिल्ह्यंत पावसाने ऑगस्टमध्येच सरासरी ओलांडली. काही भागांत तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. जून, जुलै आणि ऑगस्ट असे सलग तीन महिने सूर्यप्रकाश कमी होता. सारखे ढगाळ हवामान होते. आद्र्रता जास्त होती. जास्त पावसामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये वाहून गेली. जमिनीची धूप झाली. त्यामुळे पीक अशक्त झाले. ऊसाची प्रतिकार क्षमता कमी झाली. त्यावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाला. अनेक शेतकऱ्यांचे उसाचे फड  यंदा रोगामुळे खराब झाले आहेत. आता  शेतकरी औषधाची फवारणी करून उसाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे ऊस जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये असताना कांडी कूज, पोक्का बोईंग आणि पांढऱ्या माशीचाही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. तसेच मका पिकावर येणारी अमेरिकन लष्करी अळी आता उसावर आली आहे. हुमणी, खोडकीड हे नेहमीचे रोगही आहेत. एकूणच बदलत्या हवामानाचा मोठा फटका या पिकाला बसला आहे.

सध्या आडसाली ऊस लागवडीचा हंगाम सुरू आहे.  पोक्का बोईंग, लालकुज पानावरील तपकिरी ठिपके त्यावर दिसू लागले आहेत. मात्र आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू झाली आहे. आडसाली आणि सुरू ऊस आता वाढला आहे. त्यावर रसायनांची फवारणी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. आडसाली ऊस हा वीसपेक्षा जास्त कांडय़ावर आहे. तर सुरू आणि खोडवादेखील पंधरापेक्षा जास्त कांडय़ावर आहे. यंदा उसाची मुळे पावसामुळे कमकुवत झाली आहेत. ऊस पडला आहे. त्यामुळे त्यावर फवारणी करणे मुश्कील बनले आहे. काही साखर कारखान्यांनी ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करायचे ठरविले. पण ड्रोनचा खर्च परवडणारा नव्हता. त्याशिवाय काही तांत्रिक मर्यादाही होत्या. त्यामुळे तो पर्याय सोडून देण्यात आला आहे.

वसंतदादा साखर संस्थेच्या ऊस शास्त्रज्ञांनी लातूर, नगर आणि उस्मानाबाद भागांत जाऊन कीड आणि रोगाची पाहणी केली. या पथकाला राज्यात सर्वत्र रोग आणि कीड आढळून आली. दहा ते पंधरा टक्कय़ांनी उसाचे उत्पन्न घटेल असा या पथकाचा अंदाज आहे. त्यांनी अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत.

नव्वदच्या दशकात उसावर कानी ( काजळी ) हा रोग आला होता.  त्यानंतर पायरीला हा रोग आला. को— ७४०, को— ७२१९, को— ७५२७ या जातीवर हा रोग आला. त्या जातीची लागवड थांबली. मध्यम रोगप्रतिकारक जाती संशोधित करण्यात आल्या. त्याने उसावरील रोग गेला पण २००३ च्या सुमारास उसावर लोकरी मावा आला. पण मित्रकीड तयार झाल्याने या रोगाचे प्रमाण कमी झाले. लोकरी माव्याचे अस्तित्व अजूनही दिसून येते. पण कुठे लोकरी मावा पडला की मित्रकीड त्याला खाऊन टाकते. असे असले तरी आता हवामान बदलाचा फटका उसालाही बसला असून त्यावर रसायने किंवा जैविक कीडनाशके फवारणीची आवश्यकता निर्माण झाली आहे.

उसावर आलेल्या रोग आणि किडीचा हवामान बदलाशी संबंध आहे. जास्त पाऊस, जास्त आद्र्रता, अन्नद्रव्यांचा ऱ्हास, ढगाळ हवामान यामुळे पीक अशक्त बनते. प्रतिकारक्षमता कमी होते. त्यामुळे रोग आणि कीड वाढते. राज्यात अनेक भागांत उसावर तांबेरा, पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव झाला आहे. वीसपेक्षा अधिक कारखान्यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सरासरी दहा टक्के नुकसान या रोगामुळे होऊ शकते. ते खूप मोठे आहे.

-डॉ . भरत पवार, रोगशास्त्रज्ञ, वसंतदादा साखर संस्था, मांजरी ( पुणे )

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insect infestation of sugarcane as a result of climate change abn
Show comments