भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे राज्यात मोठय़ा प्रमाणावर बलात्कार होत असल्याचा बागुलबुवा करतात. त्यांनी बदनामी थांबवावी अन्यथा महिला त्यांच्या घरावर लाटणे व हंडा मोर्चा नेतील असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनिता गायकवाड यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मेधा कांबळे होत्या. माजी आमदार भानुदास मुरकुटे, प्रदेश उपाध्यक्ष निर्मला मालपाणी यावेळी उपस्थित होत्या.
सुळे म्हणाल्या, अमित शहा हे राज्याची दररोज बदनामी करतात. राज्य सुसंस्कृत आहे. असे असुनही बलात्कारी राज्य अशी प्रतिमा उभी करुन ते अपमान करत आहेत. महिलांबद्दलचे हे अपशब्द खपवून घेणार नाही, असे त्या म्हणाल्या.
श्रीरामपर मतदारसंघात एकमेव उच्च शिक्षित महिला उमेदवार राष्ट्रवादीच्या गायकवाड यांच्या रूपाने मिळाल्या आहेत. याउलट विरोधी पक्षांमध्ये असलेले काँग्रेसचे उमेदवार दुसरी शिकलेले असून मतदार स्वीकारणार नाहीत. मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सुटायचे असतील तर प्रश्नांची जाण आणि प्रशासनाचा अनुभव गरजेचा असतो. एका उपेक्षित समाजाच्या महिलेस या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्रथमच मिळत आहे असे त्या म्हणाल्या.
नगरसेविका मंजुश्री मुरकूटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मालपाणी, सभापती वंदना राऊत, डॉ. मेधा कांबळे यांची भाषणे झाली. सूत्रसंचलन प्रा. संगिता वडीतके यांनी केले. याप्रसंगी अर्चना पानसरे, काशिबाई डावखर, उपसभापती सुरेखा क्षीरसागर, शारदा लगड, सुनिता नजन, मिना कळकुंद्रे, नगरसेविका निर्मला मुळे आदी उपस्थित होत्या.

Story img Loader