लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : युनेस्कोच्या पथकाकडून आज किल्ले रायगडाची पहाणी करण्यात आली. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही पहाणी करण्यात आली. या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञ हेवान्ग ली, सह संचालक जागतिक वारसा (ए एस आय)मदन सिंग चौहान, महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, डॉ शुभा मजुमदार यांचा समावेश होता.

या पथकाने कुशावर्त तलाव, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज समाधी, हत्तीखाना, भवानी मंदिर आणि टोक, टकमक टोक, या महत्त्वपूर्ण ठिकाणासह विविध ऐतिहासिक खुणांना भेट दिली. या पथकाने किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सोबत झालेल्या चर्चे दरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान, वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली. तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी रायगड जिल्हाप्रशासनाने घेतलेले निर्णय, सुरु असलेली कार्यवाही तसेच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती घेतली. युनेस्को टीमने देखील देखभाल आणि संवर्धनासाठी संभाव्य सुधारणांबद्दल त्यांची मते मांडली. भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकऱ्यांशी देखील संवाद साधला.

आणखी वाचा-कर्जत ‘रोहित’मय! रोहित शर्माची ‘क्रिककिंग्डम अकॅडमी’ होणार सुरू

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी राज्यसरकारने प्रस्ताव पाठवला होता. यात रायगड किल्ल्यासह, खांदेरी, विजयदुर्ग, सुवर्णदूर्ग, जिंजी, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, शिवनेरी, साल्हेर, सिंधदूर्ग आणि राजगड या किल्ल्यांचा समावेश आहे. त्यानुसार युनेस्कोच्या पथकाकडून या किल्ल्यांची पहाणी केली जाणार आहे.

वारसाशी जोडलेल्या १२ निवडक किल्ल्यांपैकी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड किल्ला जागतिक स्तरावर ओळखण्यासाठी विचाराधीन आहे. या समावेशामुळे रायगड किल्ल्याला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळेल आणि जागतिक पर्यटक आकर्षित होतील,स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी व्यक्त केला.