शिवाजीराव देशमुख यांचा अचंबित करणारा प्रवास

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

तासगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी ते गृहमंत्री, राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेचे सभापती असा अचंबित करणारा प्रवास करणारे शिवाजीराव देशमुख. दुष्काळी भागाबरोबरच दोन वर्षांपूर्वी लातूरकरांची तहान भागविणाऱ्या चांदोली धरणाचे ते खंदे पुरस्कत्रे होते.

तासगाव पंचायत समितीमध्ये विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना वसंतदादांची नजर या तरूणावर पडली. शासकीय काम करीत असताना कायदा आणि व्यवहार सांभाळून सामान्यांची कामे मार्गी लावण्यात धन्यता मानणारा हा तरूण पोऱ्या दादांना समाजकारणात, राजकारणात हवा होता. दादांनी शब्द टाकला आणि एका तरूणाचा राजकीय प्रवास सुरू झाला. तो तरूण म्हणजे शिवाजीराव देशमुख.

कोकरूडसारख्या खेडेगावामध्ये १ सप्टेंबर १९३५ रोजी जन्म झालेल्या शिवाजीराव देशमुख यांना समाजकार्याची आवड तरूणपणापासूनच. १९६७ मध्ये झालेल्या कोयना भूकंपावेळी त्यांनी शिराळा तालुक्याच्या डोंगरी भागात लोकांच्या मदतीसाठी धाव घेतली. डोंगरदऱ्यात वास्तव्य करून राहिलेल्यांची घरे या विनाशकारी भूकंपात उद्ध्वस्त झाली होती. या लोकांना दिलासा देत नव्याने घर उभे करण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच त्यांचा समाजसेवेचा वसा सुरू झाला.

जिल्हयासाठी चांदोली धरण की खुजगाव धरण हा वाद निर्माण झाला. वसंतराव दादांनी चांदोलीचा आग्रह धरला होता, तर काही मंडळींनी खुजगाव धरणाचा आग्रह धरला होता. मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत या दुष्काळी तालुक्यांना जर पाणी द्यायचे असेल तर चांदोली धरणच उपयुक्त आहे, हे ओळखून त्यांनी वसंतदादांच्या पाठीशी राहून चांदोली धरणाचा जोरदार आग्रह धरला. यातून ३२ टीएमसी पाणीसाठा असलेले हे राज्यातील एकमेव असलेले मातीचे धरण साकारले गेले.

शिराळा पंचायत समितीचे सभापती ते जिल्हा परिषदेमध्ये समिती सभापती म्हणून काम करीत असताना विधानसभेचे वेध लागले. १९७८ मध्ये अपक्ष मदानात उतरून त्यांनी काँग्रेसचे रा. य. पाटील यांना पराभूत करीत विधानसभेत प्रवेश केला. यानंतर दोन वर्षांत १९८० मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीपासून १९९० पयर्ंत त्यांनी काँग्रेसच्यावतीने विधानसभेची निवडणूक जिंकली. १९८३ मध्ये दादांनी त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली होती. १९८५ मध्ये त्यांना स्वतंत्र कार्यभार असलेले खाते देण्यात आले. यानंतर त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदही सांभाळले. या काळात त्यांनी गृह, सामान्य प्रशासन, कृषी या खात्याचा कार्यभार उत्तम पध्दतीने सांभाळला.

विधानसभेची मुदत संपल्यानंतर १९९५ मध्ये  वरिष्ठ सभागृहात विधानपरिषदेचे सदस्यत्व सांभाळले. विधानपरिषदेचे सभापती पद त्यांनी १९९६ ते २००२ पयर्ंत सांभाळले. यानंतर ते अखेरपर्यंत विधानपरिषदेचे सदस्य होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सांगण्यावरून त्यांनी राजकीय,  सामाजिक जीवनात प्रवेश केला असला तरी डोंगरी भागातील  लोकांनाही विकासाची फळे मिळाली पाहिजेत, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्या जीवनात आर्थिक स्थर्य मिळाले पाहिजे यासाठी त्यांचा सातत्याने आग्रह होता. इंग्रजी भाषेवर असलेले त्यांचे प्रभुत्व गृहखात्याचे कामकाज करीत असताना त्यांना उपयुक्त ठरले.

१९७२ च्या दुष्काळाने अख्खा जिल्हा होरपळून गेला. या वेळी दादांनी राजकीय ताकद पणाला  लावून चांदोली येथे मातीचे धरण मंजूर करून घेतले. १९७७ मध्ये या धरणाचे भूमिपूजन झाले. १९८५ मध्ये या धरणात पाणी संचय करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी विस्थापितांची अनुकूलता मिळविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. यामुळे दुष्काळी भागाला वरदान ठरलेले चांदोली धरण हे शिवाजीराव देशमुख यांचे उचित स्मारक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Story img Loader