अहिल्यानगर : एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाला तब्बल २०० एसटी बसची कमतरता भासत आहे. सन २०१९ मध्ये जिल्ह्यातून ७४० एसटी बसमधून प्रवासी वाहतूक होत होती. मात्र पाच वर्षानंतर त्यामध्ये १२० एसटी बसची घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्याला ३० नव्या एसटी बस (लालपरी) मिळाल्या आहेत.

सध्या एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागात (जिल्ह्यात) प्रवासी वाहतुकीसाठी ६२० एसटी बस उपलब्ध आहेत. मात्र त्यातील ३५ बस नादुरुस्त आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) या बस रस्त्यावर धावण्यास मनाई केली आहे. या व्यतिरिक्त रोज सरासरी ३ एसटी बस रस्त्यात धावताना नादुरुस्त (ब्रेक डाऊन) होण्याचे प्रमाण आहे. व्यतिरिक्त १५ वर्षाचे आयुष्यमान झालेल्या एसटी बस भंगारामध्ये काढल्या जातात. अशा ९ एसटी बस लिलावाच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य सरकारच्या विविध सवलतींच्या योजनांमुळे एसटी बसकडे प्रवाशांचा कल निर्माण झाला आहे. मात्र आवश्यक त्या प्रमाणात एसटी बस उपलब्ध होत नाहीत. एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी वाहतुकीचे रोजचे भारमान ८६ टक्के आहे. अहिल्यानगर विभागाने महामंडळाकडे २०० बसची मागणी नोंदवली आहे. प्रत्यक्षात ३० बस उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील १० बस तारकपूर आगारास, १० बस शेवगाव आगारास तर १० बस पाथर्डी आगारास देण्यात आल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी अहिल्यानगर विभागाला महामंडळाकडून ६० नव्या बस उपलब्ध झाल्या होत्या. त्यानंतर आता २०० एसटी बसची मागणी असताना केवळ ३० बस उपलब्ध झाल्या आहेत. आणखी नव्या एसटी बस केंव्हा उपलब्ध होणार, याची विभागाला प्रतीक्षा आहे अहिल्यानगर विभागात ३३ स्थानके व ११ आगार आहेत. राज्य सरकारने महिलांसाठी ५० टक्के तिकिटात सवलत दिल्यानंतर रोज सरासरी ६२ हजार महिला प्रवास करू लागल्या आहेत. यासह विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक गृहीत धरून रोज २ लाख ४० हजार नागरिक प्रवासाचा लाभ घेतात.

जिल्ह्यातील ११ आगारांपैकी गेल्या फेब्रुवारी महिन्यात तारकपूर, कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा व अकोले अशा ५ आगारांना नफा झाला. यातील कोपरगाव व नेवासा आगार गेल्या वर्षभरापासून नफ्यात आहेत.

अहिल्यानगर विभागासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे २०० एसटी बसची मागणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ३० बस उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील प्रत्येकी १० बस तारकपूर, शेवगाव व पाथर्डी या आगारांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. – राजेंद्र जगताप, विभाग नियंत्रक, अहिल्यानगर.