शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी काल(शनिवार) ‘इंडिया टुडे सी-वोटर’चा सर्व्हेच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानावरून त्यांना टोला लगावला होता. कारण, इंडिया टुडे आणि सी व्होटर(मूड ऑफ नेशन)द्वारे करण्यात आलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एनडीएला झटका बसू शकतो. रिपोर्टनुसार याचा थेट परिणाम महाराष्ट्रात शिंदे-भाजपा युतीवरही होईल. सर्वेनुसार या युतीचं आगामी लोकसभा निवडणूक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी या सर्व्हेबद्दल बोलताना तो विश्वासार्ह नसल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं होतं. यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली होती, त्यांच्या टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले की, “मूळातच ते आमच्या मतावर निवडून राज्यभेत गेलेले आहेत, थोडी जरी त्यांना नैतिकतेची जाणीव असेल, तर आम्हाला आव्हान देण्याऐवजी त्यांनी राज्यसभेच्या आपल्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं. छोटीशीच तर निवडणूक असते, फक्त आमदाराच मतदान करणार आहेत, तेवढा तरी एकदा त्यांनी प्रयोग करून बघावा.” टीव्ही 9 शी ते बोलत होते.
याशिवाय, “जे झोपतात ते स्वप्न बघतात, जे जागे असतात ते काम करत राहतात. आमचे मुख्यमंत्री रात्रंदिवस काम करतात, दोन किंवा तीन तास फक्त झोप घेतात. त्यांना स्वप्न बघण्या एवढी सुद्धा फुरसत नसते, आम्हाला सुद्धा स्वप्न बघण्याएवढी फुरसत नसते.” असंही केसरकरांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते? –
“आमची आघाडी येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व विक्रम मोडीत काढेल. अशा सर्व्हेची आम्हाला गरज नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
संजय राऊत काय म्हणाले? –
“जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्व्हे असतात, तेव्हा ते हवे असतात. राष्ट्रीय स्तरावरचा सर्वे भाजपाच्या बाजूने आहे, तो त्यांना हवा आहे. पण, महाराष्ट्रातला सर्व्हे त्यांच्याविरोधात आहे. तो त्यांना नको आहे. त्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला लोकसभेच्या साधारण ३४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. मात्र, आम्ही म्हणतो या जागा ४० ते ४५ असतील. मुख्यमंत्री म्हणाले की महाविकास आघाडीला ४-५ जागा मिळाल्या तरी पुरे. माझं म्हणणं की त्यांनी कल्याण-डोंबिवलीची जागा जरी वाचवली तरी पुरे”, असा टोमणा खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला होता.