MPSC च्या प्रश्नाबाबत उत्तर देत असताना मी निवडणूक आयोग म्हणालो त्यावरून माझी खिल्ली उडवली. लोकसेवा आयोग म्हणायचं होतं पण मी निवडणूक आयोग म्हणालो त्यावर टीका झाली. पण एक लक्षात घ्या निवडणूक आयोग असो की लोकसेवा आयोग शेवटी रिझल्ट महत्त्वाचा असतो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर टीका करणाऱ्या सगळ्यांना उत्तर दिलं. तसंच शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर आम्ही त्यांना ते धरण दाखवत नाही असं म्हणत अजित पवार यांनाही एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला. निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण इथे खालच्या पातळीवरचा प्रचार सुरू आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कसबा मतदार संघात रोड शो केला त्यावेळी त्यांनी आपल्यावर झालेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

मुक्ता टिळक, गिरीश बापट यांनी निष्ठा दाखवली

मुक्ता टिळक यांच्या घरी गेलो होतो तेव्हा आजारी असतानाही त्यांनी इथल्या भागाचे प्रश्न माझ्याकडे मांडले होते. गेले अनेक वर्षांपासून कसबा म्हटलं की भाजपाचा आमदार निवडून येतो. निष्ठा काय असते ते मुक्ता टिळक यांनी दाखवून दिलं होतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. गिरीश बापट यांनाही आम्हाला प्रचारात यायला नको असं सांगितलं होतं तरीही ते आलेच. खरं तर कसब्याची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. कारण अंधेरीची पोटनिवडणूक जेव्हा झाली तेव्हा राज ठाकरे यांनी विनंती केली, शरद पवार यांनी आम्हाला विनंती केली. त्यावेळी आम्ही माघार घेतली. मात्र या निवडणुकीत असं झालं नाही. खालच्या पातळीवरचा प्रचार सुरू झाला आहे. त्याला उत्तर मतदार देतील असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आपण असल्या लोकांकडून काय अपेक्षा करणार?

आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? शेतकरी पाणी मागतो तेव्हा हे धरण दाखवतात असं म्हणत अजित पवारांना टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. काल अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घ्यायची आहे. त्यांना सांगू इच्छितो एकनाथ शिंदे माणसांमधला कार्यकर्ता आहे. किती लोक रस्त्याने उभे होते. अनेकजण विषय घेऊन येत होते. विद्यार्थी भेटत होते. आम्हाला भेटायला लोक येत होते. तोंड पळवून फिरणारे नाही. MPSC ची मुलं इथे आहेत आम्हाला क्रेडिट घ्यायचं नाही पण विद्यार्थ्यांची भूमिका तीच आमची भूमिका हे आम्ही लोकसेवा आयोगाला सांगितलं. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करून घेतो. माझ्या तोंडून लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोग झालं. आयोग कुठलाही असो रिझल्टला महत्त्व आहे असाही टोला एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.

आम्ही काहीही चुकीचं बोलत नाही, चुकीच्या ठिकाणी जात नाही. कृष्णा काठावर प्रायश्चित्त घेण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही येणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी धरणाच्या वक्तव्यावरून अजित पवार यांना टोला लगावला. आमच्या रॅलीला जो प्रतिसाद लोकांनी दिला त्याबद्दल मी लोकांना कोटी कोटी नमन करतो. कसबा मतदार संघात दुर्लभ, दुर्मिळ चित्र पाहण्यास मिळालं आहे.

Story img Loader