सातारा : हिऱ्यापोटी गारगोटी ही म्हण सध्या महाराष्ट्रात खरी ठरली आहे. बाळासाहेबांचा नकली आवाज काढणे हा पोरकटपणा आहे. नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार आचरणात येत नसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. दरे (ता. महाबळेश्वर) गावी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाशी केलेली युती, नवीन महाबळेश्वर प्रकल्प, मुनावळे येथील आंतरराष्ट्रीय जलतरण प्रकल्प, मुंबई येथील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या विषयावर आपले मत व्यक्त केले.

शिवसेना आणि भाजपची वैचारिक युती आहे. ही युती तोडण्याचे पाप त्यांनी केले होते. मुळात बाळासाहेबांनीच शिवसेना आणि भाजपाची युती केली होती. ती अविचाराने त्यांनी तोडली होती. ती युती आम्ही पुन्हा केली. बाळासाहेबांनी जे जे विचार देशाच्या संरक्षणासाठी आणि समाज व्यवस्थेसाठी मांडलेले होते ते सगळे मुद्दे, विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रत्यक्षात आणले आहेत. त्यांनी राम मंदिर बांधले, ३७० कलम रद्द केले, असे अनेक निर्णय जे बाळासाहेबांना अपेक्षित होते ते भाजपाचे नेतृत्वाने घेतले आहेत. त्यामुळे आम्ही मूळ युती बरोबर गेलो आहोत.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, २०१९ मध्ये स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि विचार सोडले. त्यांनी काँग्रेसची युती केली. त्यांचे त्यावेळचे भ्रष्टाचारी सरकार आम्ही गाडले. त्याचा राग त्यांना आल्याने ते सतत माझ्यावर, माझ्या दाढीवर टीका करत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्र विचाराची संघटना आहे, त्यालाही नावे ठेवतात. निवडणुकीत लोक बरोबर राहिले नाहीत त्यामुळे त्यांनी शंभर जागा लढवून त्यांना फक्त २० जागा मिळाल्या आणि आम्ही ८० जागा लढवून ६० जागा जिंकल्या. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची आहे हे आता लोकांना कळून चुकले आहे.

ब्रिटिशांच्या नंतर आमच्या युती सरकारने नवीन महाबळेश्वर प्रकल्प हाती घेतला आहे. आम्ही आता येथे नव्याने पर्यटनस्थळ उभारत आहोत. येथील निसर्ग संपदेचे संरक्षण केले जाईल. अतिशय अत्याधुनिक पद्धतीने हे पर्यटनस्थळ उभारले जाईल. मुनावळे येथील आंतरराष्ट्रीय जलपर्यटन केंद्रासाठी सर्व परवानग्या घेतल्या जातील. विनापरवाना कोणतेही काम केले जाणार नाही. राज्यातील बारा गड किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये झाला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच गड किल्ल्यांचे संरक्षण हे सरकार करेल. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक आमचे सरकार पूर्ण करेल. याविषयी खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केलेले मत या त्यांच्या भावना आहेत, असेही शिंदे म्हणाले.

मला गाव आहे म्हणून मी गावी येतो. मला शेती आहे म्हणून मी शेतात जातो. त्यांच्याकडे गावच नाही म्हणून ते लंडनला जातात. परदेशात फिरायला जातात. त्यांना स्वतःचे गावच नाही. त्यांना गावाचं महत्त्व काय कळणार. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री