महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, महागाई वाढली आहे, बेरोजगारीचे प्रश्न आहेत. मात्र हे सरकार फोडाफोडी करण्यात मग्न आहे अशी बोचरी टीका अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्य शासनाने चुकीची धोरणं आखली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. परेदशातून कापूस आणला त्यामुळे कापसाचे भाव पडले. यावर्षीही कापसाच्याबाबतीत तशीच परिस्थिती आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या शेती मालाला योग्य भाव दिला नाही तर महाराष्ट्रात कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
यवतमाळमध्ये ४०० हून जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर २ लाख शेतकऱ्यांना २०४ कोटींची मदत जाहीर झाली होती. मात्र ती अद्याप झालेली नाही. यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत मात्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही. यवतमाळमध्ये ४०० पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत तिथे राज्य सरकारने लक्ष दिलेलं नाही असाही आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.शेतकऱ्यांचा विषय राज्य सरकार गांभीर्याने घेईल असं वाटत नाही. कारण एक ते सव्वा वर्ष फोडाफोडाच्या राजकारणात गेलं. आधी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. त्यात एक ते सव्वा वर्ष निघून गेलं. आता ४०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकार त्या रोखण्यासाठी काय करतं आहे? असा सवाल अनिल देशमुख यांनी केला आहे.
आणखी काय म्हणाले अनिल देशमुख?
येत्या अधिवेशनात आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत. शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकार झोपलं आहे, त्यांना जागं करण्याचं काम आम्ही करु असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रश्नाकडे आम्ही वारंवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो आहोत. मात्र यांना (भाजपा) फोडाफोडीचं राजकारण करायचं आहे. आधी शिवसेना फोडली, शिवसेनेचे ४० ते ४५ आमदार फुटले. त्यामुळे खूप काही बदल होतील असं वाटलं होतं पण तसं काही झालं नाही. त्यामुळे नंतर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. ही सगळी परिस्थिती महाराष्ट्राची जनता पाहते आहे. या सगळ्या राजकारणाला जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.