आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील पक्षांनी आणि आघाड्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी खरी लढत यंदा रंगणार आहे. त्यामुळे या दोन्ही आघाड्यांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला आहे. परंतु, या दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सोडवण्याकरता दोन्ही आघाड्या बैठकांवर बैठका घेत आहेत. आज (३० जानेवारी) नरीमन पाँइट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीने बैठकीचं आयोजन केलं आहे. दुपारी २ वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात झाली आहे. परंतु, या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया वंचितचे प्रवक्ते डॉ.धैर्यवर्धन पुंडकर यांनी केलाय. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. तसंच, वंचित बहुजन आघाडीनेही महाविकास आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वंचित बहुजन आघाडी हा ठाकरे गटाचा मित्र पक्ष आहे. परंतु, तरीही या पक्षाला अधिकृतरित्या महाविकास आघाडीत स्थान मिळालेलं नाही. तरीही आजच्या जागा वाटपाच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आलं आहे. यानुसार, वंचितचे प्रवक्ते डॉ.धैर्यवर्धन पुंडकर बैठकीला हजर राहिले. परंतु, त्यांना तासभर बाहेर थांबण्याची विनंती करण्यात आली. यामुळे वंचितचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया पुंडकर यांनी दिली.

हेही वाचा >> “भाजपा कधीच वेगळा विदर्भ करणार नाही,” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा; म्हणाले…

डॉ.धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले, आम्हाला आमंत्रण देण्यात आलं होतं. आम्ही त्यांना विनंती केली होती की तुम्ही आम्हाला घटकपक्ष समजत असाल तर तसं पत्र द्या. महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे खर्गे यांच्यापैकी एकाने पत्र द्यावं. आम्ही महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहोत हेही जाहीर करावं.

“महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा आहे हेही आम्ही विचारलं होतं. ते म्हणाले की तुम्ही बाहेर बसा, आम्ही यावर चर्चा करतो. आता एक-दीड तास मी बाहेरच आहे. त्यांनी आम्हाला बाहेर बसवलं, म्हणजे त्यांनी आमचा अपमान तर केलाच आहे. तुम्ही कोणाला बोलावता तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे. जागा वाटपासंदर्भात आमचा काही आक्षेप नाही. आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत असं काही आमचं म्हणणं नाही. शेतकरी प्रश्न, बेरोजगारीसह इतर मुद्द्यांवर आपण भाजपाविरोधात एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी समान किमान कार्यक्रम आखला पाहिजे. जागा वाटप हा मुद्दा येथे नाही”, असंही डॉ.धैर्यवर्धन पुंडकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insulting the vanchit in the mahavikas aghadi meeting sgk