एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा पालघर जिल्ह्यात प्रयोग
नीरज राऊत, लोकसत्ता
पालघर : भात बियाणाच्या खरेदी, पिकावरील नियंत्रण व नियोजन करणे तसेच भाताची विक्री किफायतशीर व सुलभ पद्धतीने करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धती राबवण्यात येत आहे. त्यानुसार ‘एक गाव, एक समूह गट, एक वाण’ या संकल्पनेनुसार भात लागवड पद्धत येथे अवलंबिण्यात येत आहे. जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये अशा पद्धतीने लागवड करण्याचा प्रयत्न असून या कामी शेतकरी उत्पादक कंपन्या व सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. टाळेबंदीच्या काळात हे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. संकल्पनेनुसार एका समूह गटाने किंवा गावाने एकच वाण लावल्याने भातपिकाची वाढ एकत्रित होऊन पीक एकाच वेळी तयार होणार आहे. आवश्यकतेनुसार फवारणी किंवा रोग-कीड नियंत्रण तसेच कापणीसाठी यांत्रिकी पद्धतीचा अवलंब करणेही सहजशक्य होणार आहे.
एका समूहाकडे एकाच जातीचे मोठय़ा प्रमाणात भात उपलब्ध असल्याने त्याची विक्री करणेदेखील सोयीचे होईल. सत्यदर्शक बियाणे असल्यास पुढील तीन वर्षांसाठी शेतकरी ते पुन्हा वापरू शकतात. शिवाय समूहामध्ये पीक विमा भरण्यासाठी सोयीचे होईल. भातपिकासाठी संतुलित प्रमाणात खताचा वापर करणे शक्य होईल.
सध्या बाजारामध्ये ९० ते १०० भात बियाणे उपलब्ध असून त्यांचा तयार होण्याचा वेगवेगळा कालावधी असल्याने शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागते. बारीक दाणे असणाऱ्या जातींना शेतकरी प्राधान्य देत आहेत. स्वत:च्या वापरासाठी इतर जातींची लागवडदेखील ते करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तालुका कृषी अधिकारी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मदतीने कृषी विभागाने ही पद्धत राबविण्यास घेतली आहे. पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन पालघरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी केले आहे.
दरम्यान, ‘एक गाव, एक समूह गट, एक वाण’अंतर्गत पद्धतीत गावकऱ्यांनी किंवा समूह गटाने समजा गरवे किंवा हळव्या जातीचे एकच भाताचे वाण निवडल्यानंतर कृषी विभागाला कळवायचे असते. उपलब्धतेनुसार कृषी विभाग संबंधित दुकानदार किंवा वितरकाकडून हे बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर वाटप केले जाते. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. यशवंती शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या पद्धतीला पालघर तालुक्यामध्ये आरंभ झाला आहे. किफायतशीर दरामध्ये व वाहतुकीचा कोणताही खर्च न होता शेतकऱ्यांना शाश्वत बियाणे घरपोच मिळणार आहे.
खरिपात हंगामातही भाजीपाला लागवड
* करोना विषाणूच्या संसर्गाच्या परिस्थितीत पालघर व डहाणू तालुक्यातील काही बागायतदारांनी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात विविध रहिवासी संकुलांमध्ये थेट भाजीपाला पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे.
* हे काम सुरू राहावे त्या दिवशी यंदा खरिपामध्येदेखील काही प्रमाणात भाजीपाला लागवड करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
* भाजीपाल्याचा येथे तयार होणारा भात महानगरपालिका व शहरांमध्ये थेट विक्री करून शेतकरी ते ग्राहक साखळी निर्माण करण्यासाठी जिल्हा कृषी विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात आले.