नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हालचालीसंबंधातील गुप्त माहिती मिळवून पुढील धोका टाळण्यासाठी नक्षलवाद विरोधी अभियानांतर्गत आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आधिपत्याखाली नागपूर येथील सुराबर्डी येथे लवकरच एक ‘नक्षलवाद गुप्तवार्ता कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. नक्षलवाद्यांची गुप्त माहिती मिळविण्यासाठी स्रोत तयार करण्यासाठी शासनाने दहा लाख रुपयांचा गुप्त निधी मंजूर केला आहे.  नक्षलग्रस्त जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांचा वाढता प्रभाव पाहता शासनाने नक्षलवादविरोधी अभियान सुरू केले आहे. तरीही या भागात नक्षलवाद्यांनी स्थानिक नागरिकांना धमकावणे, येथील निवडणुकीत सहभाग घेणाऱ्यांवर हल्ले करणे, पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून नागरिकांना मारणे असे प्रकार घडत आहेत. नक्षलवाद्यांच्या अत्याचाराला कंटाळून काही लोक स्थलांतरही करत असल्याचे समोर आले आहे. शासनाने नक्षलवादविरोधी अभियान आणखी कडक केले आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्य़ातील नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हालचालीसंबंधातील माहिती गुप्तरीत्या मिळवून, संभाव्य नक्षल कारवायांना प्रतिबंध करता यावा आणि होणारी जीवत-वित्तहानी टळावी, यासाठी नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आधिपत्याखाली या भागातच एक गुप्तवार्ता कक्ष सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
नक्षल अभियानासंबंधी गुप्तवार्ता गोळा करण्याचे हा विभाग केंद्रबिंदू राहणार आहे. गुप्त माहिती मिळवण्यासाठी या भागात विविध पातळीवर स्रोत तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता होती. त्यासाठी शासनाने दहा लाख रुपयांचा निधी तूर्तास मंजूर केला आहे. हा खर्च गृहविभागाच्या आकस्मिता निधीतून करण्यात येणार आहे. या निधीत पुढील काळात वाढ केली जाणार आहे.