मनसेने मशिदींवरील भोंगे हटवले नाही तर उद्या राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. यासंबंधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी कट आखण्यात आला असल्याचा अलर्ट गुप्तचर विभागाने दिला आहे.
इतर राज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचं गृह विभागाने सांगितलं आहे.
“राज ठाकरेंवर आजच कारवाई होणार”; पोलीस महासंचालकांची महत्वाची माहिती
संजय राऊतांचीही माहिती
“महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू आहे. राज्याबाहेरील काही लोकाना इथे आणून दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वत:ची ताकद नाही, तर बाहेरून लोक आणून महाराष्ट्रात अस्थिरता आणि बेकायदेशीर कृत्य करण्याचे प्रय़त्न सुरू आहेत. अल्टिमेटमचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही, इथे केवळ ठाकरे सरकारचा शब्द चालेल.” असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितंल आहे.
पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई
पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात
“कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत,” असं रजनीश सेठ यांनी सांगितलं.
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
दरम्यान राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमधील सभेतील भाषणानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. राज ठाकरेंसोबत सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आङे. राज ठाकरेंच्या सभेचे व्हिडीओ पाहिल्यानतंर ही कारवाई करण्यात आली आहे.