आघाडी व महायुतीमधील जागावाटपावरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगावरून उमेदवारांची यादी जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे इच्छुकांचे कान मुंबईकडे आणि ध्यान मतदार संघातील जुळणीकडे लागले आहेत. राजकीय पक्षांच्या उमेदवारीची वाट न पाहता उद्या अनेक मातब्बर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मिरजेची उमेदवारी प्रा. सिध्दार्थ जाधव यांना वनमंत्री डॉ.कदम यांनी जाहीर करताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध करीत बंडखोरी करण्याचा निर्णय गुरूवारी घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आपली पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली असून जाहीर झालेल्या यादीनुसार सांगलीत स्वाती िशदे, तासगांव सुधाकर खाडे, खानापूर भक्तराज ठिगळे, जत भाउसाहेब कोळेकर यांची नावे आहेत.
वनमंत्री डॉ. कदम यांनी काल मिरज मतदार संघातून प्रा. जाधव यांचे अनपेक्षित नाव जाहीर केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र पक्षाने रात्री जाहीर केलेल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने आज दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. गुरूवारी सायंकाळी झालेल्या बठकीत चंद्रकांत सांगलीकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळो अथवा न मिळो उद्या उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बठकीस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, शहराध्यक्ष रफिक मुजावर, पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे, माजी सभापती खंडेराव जगताप आदीसह विविध गावचे सरपंच, कार्यकत्रे उपस्थित होते.
दरम्यान, गृहमंत्री आर. आर. पाटील हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र आघाडीत निर्माण झालेल्या जागा वाटपातील बेबनावामुळे त्यांनी आपली उमेदवारी दाखल करण्याचा आजचा निर्णय उद्यापर्यंत स्थगित केला. आज त्यांनी तासगावमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेउन जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या मेळाव्यात बोलताना आबांनी सांगितले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजरात ठरविणार असेल तर अशा लोकांच्या हाती महाराष्ट्र देण्याचा विचार येथील स्वाभिमानी जनता कदापि करणार नाही.
महायुतीमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदानंतर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीने सर्व जागावर लढण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे. यानुसार तासगांवमधून अजित घोरपडे, खानापूरमधून गोपीचंद पडळकर, शिराळ्यातून शिवाजीराव नाईक यांची उमेदवारी अंतिम करण्यात आली आहे. सांगलीची उमेदवारी निश्चित करण्यासाठी खा. संजयकाका पाटील, आ. चंद्रकांत पाटील, विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची समिती नियुक्त करण्यात आली असून जतबाबतही अद्याप अनिर्णीत स्थिती आहे. जतमध्ये आ. प्रकाश शेंडगे यांनी आपण पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत शनिवारी उमेदवारी दाखल करणार असल्याचे सांगितले.

Story img Loader