इंजिनिअरपासून सिनेअभिनेते या वाटचालीचा प्रवास कशाप्रकारे केला याचा उलगडा मंगळवारी प्रभाविष्कार अंतर्गत इंद्रधनु महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मिलिंद गुणाजी यांनी सर्वासमोर केला.
वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून प्रभाविष्कार उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रभाविष्कार अंतर्गत इंद्रधनु महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी मंगळवारी सायंकाळी सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  होते. या वेळी ज्युनियर व सिनिअर कॉलेजचे  प्राचार्य डॉ. गणेस अग्निहोत्री, माध्यमिक शाळेचे प्राचार्य नीलेश मगर, प्रशासकीय अधिकारी सुभाष कुलकर्णी, प्रभाविष्काराच्या कार्याध्यक्षा प्राध्यापक आशा बोराडे, संजीवनी नाईक, विद्यार्थी प्रतिनिधी मंदार पाटील व इतर मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या इंद्रधनु महोत्सवाच्या वेळी सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी यांनी आपला जीवनपट व्यक्त करताना सांगितले की, इंजिनिअरिंगमधून शिक्षण घेऊन क्रिकेट व बॅडमिंटनमध्ये आपले करीअर करण्याची धारणा होती. परंतु नशिबाला कर्तृत्वाची जोड लाभल्याने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मॉडेलिंग केले. विशेष नामांकित कंपन्यांमध्ये मॉडेल म्हणून जाहिरात केली. त्यानंतर सिरियल, चित्रपटसृष्टीत प्रवास केला. ‘कुरुक्षेत्र’सारख्या सिरिअलमध्ये  काम केल्यानंतर फरेब, द्रोहकाल, विरासत अशा विविध मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये हिरो व खलनायक म्हणून काम केले. फोटोग्राफीची आवड, लेखक, कवी व संशोधक असा छंद असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
वडील बाळ गुणाजी यांच्यामुळे विविध ठिकाणी प्रवास करायला मिळाला. अलिबाग, लोणावळा, खंडाळा अशा अनेक ठिकाणी फिरायला जायचो. त्यांच्यामुळे खऱ्या भटकंतीला सुरुवात झाली. संपूर्ण भारतभ्रमण केले आहे. विविध किल्ल्यांच्या ठिकाणी जाऊन त्या किल्ल्यांचे निरीक्षण करून  तेथील अनेक फोटो काढून इतिहास व भूगोलाची सांगड घातली आहे, असे त्यांनी सांगितले.
कविता व लेखनाची आवड असल्याने त्यांनी अनेक पुस्तके व कविता केल्या आहेत. चंदेरी भटकंती आदीसारखे पुस्तक प्रकाशित केले आहे. हिंदी, मराठी चित्रपटांबरोबर साऊथ इंडियन व इंग्रजी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. त्यामध्ये सध्या साऊथमध्ये गाजत असलेला चित्रपट म्हणजे ‘कृष्णम वंदेम जगत्गुरू’ हा होय. त्याचबरोबर भविष्यात ‘टपाल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. माझ्या आयुष्यातील जास्तीतजास्त वेळ हा भटकंती करण्यात व विविध गोष्टींचे ज्ञान घेण्यासाठी गेला आहे. त्यामध्ये माझ्या कुटुंबाची साथ मला सतत राहिली असल्याचे त्यांनी मनमोकळेपणाने सांगून आपल्या यशाचे अंतरंग उलगडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा