|| दयानंद लिपारे
संदर्भ बदलल्याने महाडिक कुटुंबीयांच्या भूमिकेची कसोटी
गोकुळ दूध संघातील वाद तापला असताना आता त्याला निवडणुकांच्या राजकारणाचा रंग चढू लागला आहे. ‘गोकुळ’सारखी मलईदार संस्था ताब्यात असल्याने कोल्हापूर लोकसभा आणि सांगलीतील शिराळा विधानसभा मतदारसंघात महाडिकांच्या घरातील उमेदवार निवडून आणण्याची घोषणा करून ‘गोकुळ’चे सर्वेसर्वा, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी नव्या राजकीय समीकरणाला आणि वादंगालाही तोंड फोडले आहे.
खासदार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीत असल्याने त्यांचा प्रचार करण्यासाठी भाजपत असलेले काका महाडिक पुढे येणार का, की ते विद्यमान खासदारांना भाजपची उमेदवारी देणार यावर वितंडवाद होत आहे. शिराळय़ातही भाजपचे आमदार असताना ते कसा शह देणार हाही वादाचा मुद्दा पुढे आला आहे. यात उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या महाडिक यांच्या राजकीय निष्ठेचा प्रत्यय येणार आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) बहुराज्य संस्था नोंदणीवरून कोल्हापूर, सांगली आणि उत्तर कर्नाटकचे राजकारण ढवळून निघाले आहे. महादेवराव महाडिक यांनी तर कट्टर विरोधक सतेज पाटील यांच्या उंबरठय़ाला धडक दिली. हा वाद झडत असताना महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीला पुतणे धनंजय महाडिक यांना निवडून आणणार असून त्याला रोखण्यासाठी कोण पुढे येतो, असे खुले आव्हान दिले आहे. मात्र, यातून काही राजकीय प्रश्नांचा गुंता निर्माण झाला असून त्यातून काका महाडिक यांनाच सोडवणूक करावी लागणार आहे.
काका महाडिक यांनी आपण भाजपशी जोडलो गेलो असल्याचे उघडपणे म्हटले आहे, पण लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले धनंजय महाडिक यांच्या प्रचारात उतरणे स्वाभाविकपणे आले. अशा वेळी युतीच्या उमेदवाराविरुद्ध ते प्रचारात उतरणार हेही निश्चित. नव्याने सत्तारोहणाच्या तयारीत असलेल्या भाजपला ही गोष्ट चालणार का, हा प्रश्न यातून उद्भवत आहे. काही झाले तरी महाडिक यांचा हा पवित्रा भाजपला सहन करावा लागणार आहे. काका महाडिक यांचे सुपुत्र अमल हे भाजपचे आमदार आहेत, तर स्नुषा शौमिका महाडिक या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. महाडिक भाजपचे सदस्य नाहीत, पण त्यांची ताराराणी आघाडी जिल्ह्यत भाजपला साहाय्यभूत राजकारण करत आहे. या बाबत भाजपचे सरचिटणीस, आमदार सुरेश हाळवणकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले, की महाडिक हे स्वत:च एक पक्ष आहेत. ते धनंजय महाडिक यांचा प्रचार करणार असतील तर भाजपला आक्षेप असण्याचे कारण नाही. महाडिक हे खासदारांच्या प्रचारात उघडपणे उभे राहणार असतील तर अशा वेळी अमल-शौमिका या भाजपवासीयांची भूमिका काय राहणार यावर वादाचे तरंग उमटत राहणार.
शिराळय़ात भाजपला विरोध?
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे जाणार असल्याने भाजपकडे झुकलेले महाडिक यांना पुतण्याच्या प्रचारात सहभाग घेण्यास अडचण येणार नाही. मात्र, शिराळय़ात विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपचे आहेत. नाईक यांच्या विरोधात महाडिक हे दुसरे पुतणे सम्राट यांना रिंगणात उतरवणार असल्याने येथे थेट भाजपविरोधात किल्ला लढवावा लागणार आहे. येथे नारायण राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेकडून निवडणूक लढवण्याचा इरादा सम्राट यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राणे, महाडिक अशी मंडळी विरोधात असताना नाईक यांना कमळ फुलण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.