आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर रायगड जिल्ह्य़ात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बुधवारी रोहा येथे शिवसेनेचा मेळावा झाला. मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचा अनुभव लक्षात घेतला, तर शिवसेनेला अंतर्गत मतभेद मारक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीवर्धन, अलिबाग आणि कर्जत मतदारसंघांत पक्षाला याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. पक्षांतर्गत मतभेद आणि वर्चस्ववादाचा योग्य बंदोबस्त केला नाही तर आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला याची मोठी किंमत चुकवावी लागण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत खासदार अनंत गीते आणि रामदास कदम यांच्या मदभेदांचा फटका शिवसेनेला बसला होता. मंडणगड, दापोली, खेडमध्ये गीते यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. मात्र रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, पेण, रोहा तालुक्यांनी भरून काढल्याने गीते अवघ्या अडीच हजार मतांनी निवडून आले.
विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले. श्रीवर्धन मतदारसंघातून कृष्णा कोबनाक यांनी बंडखोरी करत भाजपकडून निवडणूक लढवली. तर कर्जतमध्ये महेंद्र थोरवे यांनी बंडखोरी करत शेकापकडून निवडणूक लढवली, याची मोठी किंमत पक्षाला चुकवावी लागली. कर्जतमधून हनुमंत िपगळे आणि श्रीवर्धनमधून रवी मुंढे यांचा पराभव झाला. दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादीचे उमेदवार अत्यल्प मताधिक्याने विजयी झाले. अलिबाग मतदारसंघातून महेंद्र दळवी यांना उमेदवारी दिल्याने मतभेद उफाळून आले. बंडखोरी झाली नाही. मात्र शिवसेनेच्या पारंपरिक वर्चस्व असणाऱ्या विभागात सेनेची पीछेहाट झाल्याचे दिसून आले. चौल, रेवदंडा, कोर्लई, नागाव, बोर्ली या पट्टय़ात सेनेला अपेक्षित मत मिळाली नाहीत. त्यामुळे दळवी पराभूत झाले. पेण मतदारसंघात संजय जांभळे यांनी केलेली बंडखोरी सेनेच्या किशोर जैन यांना भोवली होती.
या निवडणूक निकालानंतरही शिवसेनेने बोध घेतल्याचे दिसून येत नाही. सेनेत बाहेरून आलेले शिवसनिक आणि एकनिष्ठ शिवसनिक असे दोन गट आजही सक्रिय आहेत. पक्षांतर्गत वर्चस्ववादासाठी आणि आपले महत्त्व अबाधित राखण्यासाठी ते कार्यरत आहेत. पक्षसंघटना बांधणारे नेते अडगळीत पडले आहेत. तथाकथित एकनिष्ठांकडून त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. पक्ष संघटना मजबूत करता यावी म्हणून जिल्ह्य़ात तीन जिल्हाप्रमुख नेमले गेले. मनोहर जोशी यांच्या जागेवर आदेश बांदेकर यांची संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली गेली. पण आदेश बांदेकर जिल्ह्य़ातील पक्ष संघटनेत फारसे सक्रिय होऊ शकले नाही. त्यामुळे या पक्षांतर्गत बदलांचा नेमका काय फायदा झाला याचे अवलोकन पक्षप्रमुखांनी करणे गरजेचे आहे.
निवडणुका जिंकण्यासाठी एकनिष्ठ कार्यकत्रे असून चालत नाही, तर लोकांचा भक्कम पाठिंबा असणारे आणि कार्यकर्त्यांची फौज असणारे सोबत असणारे कार्यकत्रे लागतात. हे पक्षनेत्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. आज जिल्ह्य़ातील पक्ष संघटनेचे नेतृत्व करील असा एकही नेता शिवसेनेत नाही. केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी संभाळणाऱ्या गीते यांनी स्थानिक राजकारणात गुंतून राहणे अपेक्षित नाही.
शिवसेनेकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची भाषा केली जात आहे. मात्र शेकाप आणि राष्ट्रवादीसारखे समविचारी पक्ष आता एकत्र आले आहेत, त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. अशा परिस्थितीत जर एक त्यांच्या विरोधात लढायचे असेल तर अंतर्गत मतभेद आणि पक्षांतर्गत वर्चस्ववाद मोडीत काढणे गरजेचे आहे. बाहेरून पक्षात येणाऱ्या लोकांना पक्षात सामावून घेणे आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणे अभिप्रेत आहे. अन्यथा आगामी काळात पक्षाची वाताहत सुरूच राहील यात शंका नाही.