International Duaghters Day 2024: आज जगभर जागतिक कन्या दिन साजरा केला जात आहे. मुलींचं कोड कौतुक व्हावं, त्यांना आशीर्वाद मिळावेत याकरता हा दिन साजरा केला जातो. भारतातील स्त्रीभ्रूण हत्या थांबाव्यात याकरता या दिनाची सुरुवात झाली. त्यानिमित्ताने राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक्स पोस्टवर दोघांचाही सुंदर फोटोही शेअर केलाय. तसंच, राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या मुलींबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

“या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त मुलींचा जन्म साजरा करूयात. त्यांना नेहमी नवीन उंची गाठण्यासाठी सक्षम करू या. माझ्या प्रिय दिविजाला कन्या दिनाच्या शुभेच्छा! माझा अभिमान, आनंद आणि शक्ती”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पुढे म्हणाले, “स्वप्नांना तुझ्या नवे पंख मिळू दे, भविष्याला तुझ्या नवा आकार मिळू दे… आंतरराष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा!”

दिविजाचं वय आता साधारण १५ वर्षे आहे. सध्या ती शाळेत शिकत असून विविध सामाजिक कार्यक्रमातही ती सहभाग घेत असते.

हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या अर्जाचे पैसे कधी येणार? लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांनी दिली माहिती

जितेंद्र आव्हाडांनीही शेअर केला जुना फोटो

जितेंद्र आव्हाड यांनीही एक जुना फोटो शेअर केलाय. या पोस्टमध्ये आव्हाड म्हणाले, “हा माझा आणि माझ्या मुलीचा एक जुना फोटो… हा फोटो जेव्हा जेव्हा पाहतो ना तेव्हा मन रमतं जुन्या आठवणींत…. वाटतं ज्यांच्या घरी मुली आहेत ते नेहमी आनंदी असतात, त्यांचं घर हसतं खेळतं असते. नेहमी प्रसन्न असते. आणि हे घर आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे…

जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचं नाव नताशा आव्हड असून तिचं लग्न झालंय. लॉकडाऊन काळात अत्यंत साध्या पद्धतीने घरच्या घरी विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या या सोहळ्याचं कौतुक करण्यात आलं होतं.