योगदिन २१ तारखेला साजरा करण्यामागे संघाची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करून या पद्धतीने विचारसरणी लादता येणार नाही, असे रोखठोक मत ज्येष्ठ साम्यवादी नेते ए.बी. बर्धन यांनी रविवारी नागपुरात व्यक्त केले.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ज्येष्ठ कामगार नेते मोहन शर्मा यांच्या अमृत महोत्सवी सत्कार कार्यक्रमानंतर बर्धन पत्रकारांशी बोलले. २१ जून रोजीच योगदिन साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. त्याच दिवशी संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांची पुण्यतिथी आहे. हा योगायोग नक्कीच नाही. या कार्यक्रमाद्वारे हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न असून रा.स्व. संघानेच हा कार्यक्रम (अजेंडा) आखला आहे. अशा पद्धतीने कुठली विचारसरणी लादली जाऊ शकत नाही. योग ही वैयक्तिक बाब आहे. तो एक व्यायाम प्रकार आहे. मात्र, त्याची कुणावर जबरदस्ती केली जाऊ शकत नाही, असे बर्धन म्हणाले.
आझमखान यांना योग करण्याचा सल्ला
बलिया : भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांना योग करावा, असा सल्ला दिला आहे. खान यांनी रोज सूर्यनमस्कार घातले तर ते हास्यास्पद विधाने करण्यापासून स्वत:ला निश्चितच रोखू शकतील, असेही आदित्यनाथ यांनी पुढे स्पष्ट केले. त्यांनी सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केल्यास केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही अधिक सुदृढ होईल आणि हास्यास्पद विधाने करण्यापासून ते स्वत:ला रोखू शकतील, असे आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.
मायावतींची मोदी सरकारवर टीका
लखनौ : योग दिवस साजरा करण्याच्या निर्णयाचे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी स्वागत केले आहे. मात्र या प्रकरणी सरकार जातीय भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.