राज्यातील ग्रामपंचायतींनाही इंटरनेट बँकिंगसारख्या १९ प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा लवकरच उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी आज भेंडा (ता. नेवासे) येथील कार्यक्रमात दिली.
लोकनेते मारुतराव घुले यांच्या ८३व्या जयंतीनिमित्त ग्रामविकासमंत्री पाटील यांना यंदाचा ‘मारुतराव घुले स्मृती पुरस्कार’ पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्या वेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिचड होते. या वेळी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, आमदार शंकरराव गडाख, आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार अप्पासाहेब राजळे, प्रसाद तनपुरे, नरेंद्र घुले, भानुदास मुरकुटे, प्रसाद तनपुरे, दादा कळमकर आदी उपस्थित होते.
सामान्यांच्या जीवनात बदल घडवला नाहीतर पदाचा उपयोग नाही, या घुले यांच्या विचारावर आधारित काम केल्यानेच आम्हाला यश मिळाले, त्यामुळेच युती सरकारच्या काळात घसरलेला राज्याचा गाडा रुळावर आणू शकलो, असे सांगून पाटील म्हणाले, की गरिबांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे ग्रामविकास मंत्रालयाचे प्रयत्न आहेत. त्यासाठीच गावपातळीवर बँक नसली तरी ग्रामपंचायतींना इंटरनेट बँकिंगसह विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. ई-टेंडरच्या प्रयोगामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात पारदर्शकता येण्यासाठी क्रांतिकारक ठरला आहे.
या वेळी पाटील यांनी भेंडा येथील नागेबाबा देवस्थानला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले. प्रशासनातील लोक हल्ली सहकाराला पहिल्यासारखी किंमत देत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
स्वाभिमानाने जीवन जगताना समाजाला चांगली दिशा कशी द्यायची हे आपण घुले यांच्याकडूनच शिकलो, त्यांचेच कार्य आमदार चंद्रशेखर व माजी आमदार नरेंद्र पुढे चालवत आहेत, असा गौरव करून पालकमंत्री पिचड म्हणाले, की पाटील यांनी प्रत्येक खात्यावर अभ्यासूपणाने ठसा उमटवला, त्यामुळे योग्य व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला, परंतु जिल्हा बँकेने याची जाहिरात न केल्याने नोंद घेतली गेली नाही, अशी खंत पिचड यांनी व्यक्त केली.
आमदार पाचपुते, आमदार गडाख यांची भाषणे झाली. भैयासाहेब देशमुख यांनी स्वागत केले. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी प्रास्ताविक केले.
मुख्यमंत्र्यांना टोला
भिजत घोंगडे न ठेवता लोककल्याणासाठी त्वरित निर्णय घेण्याची आमची कार्यपद्धत आहे, वेळप्रसंगी कटू निर्णय घेतल्यानेच युती सरकारमुळे घसरलेला राज्याचा गाडा सावरला, त्या वेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, असा टोला मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे लगावला. पिचड विरोधी पक्षनेते असतानाच त्यांनी आम्हाला बोलण्याची सवय लावली, राष्ट्रवादीत सर्वाना संधी दिली जाते, सध्या विरोधी पक्ष नेते दुसऱ्याला बोलूच देत नाहीत, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.