यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय युवा पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी जेएनसी महाविद्यालयात होणार आहे. या निमित्ताने अभिनेता किशोर कदम व ‘फँड्री’ या लोकप्रिय चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची प्रकट मुलाखत नाटय़लेखक प्रा. अजित दळवी व निवेदक दत्ता बाळसराफ घेणार आहेत.
सामाजिक व क्रीडा क्षेत्रात देदीप्यमान काम करणाऱ्यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार दिला जातो. या वर्षी पॅरा बॅडमिंटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मार्क धर्माय यांना दिला जाणार आहे. ५१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मेळघाटात आरोग्यसेवा पुरविणाऱ्या डॉ. प्रियदर्शन तुरे यांना तसेच ठाणे जिल्ह्य़ातील जव्हार येथील आदिवासी हक्क आणि विकास या क्षेत्रात काम करणाऱ्या श्रद्धा शंृगारपुरे यांना सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. युवती गटातून क्रीडा क्षेत्रातील पुरस्काराची मानकरी औरंगाबादची तेजस्विनी मुळे ठरली असून मधुकरअण्णा मुळे व अंकुश कदम यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview of fandry fame kishor kadam and nagraj manjule