महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सोमवारी नगरला येत आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ दरम्यान जिह्य़ाच्या दक्षिण मतदारसंघातील, तर दुपारी २ ते सायंकाळी ६ दरम्यान जिल्ह्य़ाच्या उत्तर मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी ही माहिती दिली. आमदार नितीन सरदेसाई, सरचिटणीस जयप्रकाश बावीस्कर व आमदार दीपक पायगुडे, सहकार सेना विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव नलावडे, संपर्क अध्यक्ष संतोष धुरी व सुनील बांभुळकर आदी इच्छुकांविषयी चाचपणी करतील व मुलाखती घेणार आहेत. नगर शहर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डी व राहुरीतील मुलाखती नगर शहरातील सरकारी विश्रामगृहावर तर नेवासे, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव, संगमनेर व अकोले मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती शिर्डी येथील सरकारी विश्रामगृहावर होणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी केवळ १० कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमवेत उपस्थित राहावयाचे आहे. वरिष्ठ पदाधिकारी इच्छुकांकडून विधानसभेची माहिती घेतील व त्याचा अहवाल पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सादर करणार आहेत. इच्छुक व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन जिल्हा सचिव वसंत लोढा, संजय झिंजे, सचिन पोटरे, देविदास खेडकर, ज्ञानेश्वर गाडे, डॉ. अरुण इथापे, शहराध्यक्ष गिरीश जाधव आदींनी केले आहे.

Story img Loader