राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना प्रशासन अथवा मान्यताप्राप्त संघटनेकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात तसेच इतर व्यक्तिगत समस्या सोडविण्याठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने ‘हेल्पलाइन’ सुरू करण्यात आली आहे. तसेच २०१५ हे ‘मिशन संघर्ष वर्ष’ म्हणून जाहीर करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली आहे. परिवहन महामंडळाच्या इतिहासात कामगार चळवळीत प्रथमच टोलमुक्त हेल्पलाइनचा उपक्रम राबविण्यात येत असून कर्मचाऱ्यांनी ९०२१२१२००० या क्रमांकावर मिस्ड कॉल केल्यास क्षणात सदर कर्मचाऱ्यास एक एसएमएस पाठविण्यात येईल. त्यावर कर्मचाऱ्याने आपली अडचण अथवा तक्रार देण्यात येणाऱ्या ई-मेलवर पाठवायची आहे. तक्रारीवर तत्काळ कार्यवाही करून त्या कर्मचाऱ्यास दूरध्वनीद्वारे त्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. या हेल्पलाइनमुळे अन्यायग्रस्त, पीडित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हेल्पलाइनवर तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येणार आहेत.  महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार शासकीय-निमशासकीय तसेच इतर महामंडळातील कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाप्रमाणे किंवा २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी, केंद्र सरकारच्या कामगारविरोधी व एसटी महामंडळाविरोधातील प्रस्तावित रोड ट्रान्स्पोर्ट अ‍ॅण्ड सेफ्टी अ‍ॅक्ट २०१४ मधील खासगी टप्पे वाहतुकीला परवानगी देणे तसेच इतर एसटी महामंडळाला मारक असलेल्या अटी व शर्ती वगळण्यात याव्यात यांसह एसटी बँकेच्या आगामी निवडणुकीबाबतचे धोरण व इतर प्रलंबित मागण्यांकरिता इंटकच्या वतीने २०१५ हे संघर्ष वर्ष जाहीर करण्यात आले आहे. या वर्षभरात कामगारांच्या हक्कांसाठी व प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे राज्यातील सर्व आगार व विभागीय अध्यक्ष, सचिव व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती इंटकचे कार्याध्यक्ष मुकेश तिगोटे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा