कर्जत : तौसिफ शेख यांची आत्महत्या नसून हत्या आहे, यामुळे या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करून चौकशी करावी. शेख यांच्या मृत्यूस कर्जतच्या मुख्याधिकाऱ्यापासून ते तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस निरीक्षक आणि स्वत: जिल्हाधिकारी हे जबाबदार आहेत. या सर्वावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर ३०२चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केली.
तौसिफ शेख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मंगळवारी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे येथे आले होते. या वेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड, उमेश परहर उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले, की तौसिफ शेख या युवकाने समाजासाठी आणि त्यांच्या धर्माच्या जागेसाठी बलिदान दिले आहे. ही घटना घडून आज पाच दिवस झाले तरी या मतदारसंघाचे आमदार असलेले राम शिंदे फिरकले नाहीत. आम्ही येणार असल्याचे समजल्यावर ते दौऱ्यामध्ये बदल करून धावत पळत भेट देतात. त्यांच्याच मतदारसंघात एवढी मोठी घटना घडल्यानंतरही त्यांना या कुटुंबीयास भेट देण्यास एवढे दिवस लागतात, याचाच अर्थ त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात सौम्य भूमिका घेतली असा संशय आहे.
मुंडे म्हणाले, की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देऊन एक युवक आत्मदहन करतो आणि त्याला वेळेवर उपचार मिळत नाहीत. जिल्हाधिकारी तिथेअसून ते बाहेरदेखील येत नाहीत, यावरून ते किती असंवेदनशील आहेत हे दिसून येते. आम्ही याबाबत विधानपरिषदेमध्ये आवाज उठवणार असून, निवृत्त न्यायाधीश यांच्या मार्फत चौकशीची मागणी करणार आहोत.