नंदुरबार : नाशिकच्या इगतपुरीसह अहमदनगर जिल्ह्यात आदिवासी पालकांनी आपल्या मुलांना पैशांसाठी वेठबिगारीसाठी विकण्याचा प्रकार दुर्दैवी असून अशा प्रकारच्या घटना यापुढे घडू नयेत, यासाठी विभागाकडून सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केले.

इगतपुरी तालुक्यातील कातकरी समाजाच्या १८ मुलांना वेठबिगारीसाठी पालकांनीच विकल्याचे उघड झाले. मेंढय़ा चारण्यासाठी विकण्यात आलेल्या आठ मुलांची पोलिसांनी सुटका केली. तर, एका १० वर्षांच्या मुलीचा छळामुळे मृत्यू झाला. असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारी घेणार आहोत. कातकरी समाजासाठी विभागाने विशेष नियोजन सुरू केले आहे. आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, घरकुल, शिधापत्रिका या सुविधा त्यांना देण्यासाठी डिसेंबरच्या अगोदर नियोजन करून अंमलबजावणी केली जाईल. या प्रकरणात मुले विक्री आणि खरेदी करणाऱ्यांची विभागाकडून सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे संकेतही गावित यांनी दिले.

झाले काय? ‘लोकसत्ता’त आलेल्या वृत्तानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दखल घेत राज्य शासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. आदिवासी विकासमंत्री डॉ. गावित यांनी यासंदर्भात घडलेला प्रकार गंभीर असल्याचे नमूद केले.

असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. ज्या कातकरी समाजात ही घटना घडली, त्यांच्यासाठी डिसेंबरच्या आत सुविधा देण्याविषयी नियोजन केले जाईल.

– डॉ. विजयकुमार गावित

Story img Loader