लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराजे यांचे चुलत बंधू व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची फलटण येथील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने दुसऱ्या दिवशी गुरुवारी दिवसभर चौकशी केली. या छाप्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कारवाईच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांची त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी दुसऱ्या दिवशीही कायम आहे.
प्राप्तिकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची तब्बल ३६ तासांनंतर चौकशी सुरूच आहे. विभागाचे अधिकारी बुधवारी रात्री उशिरा संजीवराजे यांच्या फलटण येथील बंगल्यातून बाहेर पडले. आज दुसऱ्या दिवशीही फलटण येथे पहाटे सहा वाजल्यापासून प्राप्तिकर विभागाची चौकशी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, आज रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की प्राप्तिकर विभागाची योग्य पद्धतीने चौकशी सुरू आहे. आमच्याकडे सापडण्यासारखे काहीही नाही. प्राप्तिकर विभागाचे सर्व नियम पाळले गेले आहेत. त्यांना याबाबत काही माहिती हवी आहे. त्याची विचारणा ते करत आहेत. अशा चौकशीतून ज्यांना आनंद मिळत आहे, त्यांनी तो घ्यावा. दरम्यान, या कारवाईच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांची त्यांच्या निवासस्थानाबाहेर दुसऱ्या दिवशीही मोठी गर्दी होती. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चौकशी कायद्यानुसार – गोरे
प्राप्तिकर किंवा ईडीकडून होणारी चौकशी हा कायद्याचा एक भाग आहे. विरोधी राजकीय पक्षातील नेत्याची चौकशी सुरू झाली, की ‘राजकीय सूडबुद्धी’ असा कांगावा केला जातो. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची चौकशी झाली, की ‘ती कायदेशीर बाब आहे’ असे म्हटले जाते. जर प्राप्तिकर विभागाला त्यांच्या व्यवहाराबाबत काही आक्षेप असतील, तर ते चौकशी करत असतील, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे.