सातारा : पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असणाऱ्या महाबळेश्वरच्या कांदाटी खोऱ्यातील अहिर येथील डोंगरफोड प्रकरणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण गंभीर असून, दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. डोंगरफोडीचा हा प्रकार उजेडात येताच पर्यावरणप्रेमींमधूनही संताप व्यक्त होऊ लागला आहे.

साताऱ्यात होऊ घातलेला नवीन महाबळेश्वर प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. या प्रकल्पातील रस्ते आणि अन्य कामांना आवश्यक असलेल्या दगड, खडी आणि मुरूमासाठी परिसरातीलच डोंगर फोडण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये बुधवारी प्रसिद्ध केले. याची दखल घेत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे आणि महाबळेश्वरच्या तहसीलदारांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संवेदनशील क्षेत्रात डोंगरफोडीची घटना घडली असल्यास त्याबाबत कठोर कारवाई करणार असल्याचेही कचरे यांनी सांगितले. कोयना कांदाटी खोऱ्यात यापूर्वी वृक्षतोडही झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी या खाणींवर खडी बनवण्याचा प्रकल्पही सुरू केला आहे. या सर्व घटनांमागे मोठ्या राजकीय नेत्यांचे धागेदोरे असल्याने प्रशासनाने आजवर डोळेझाक केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.

दरम्यान, नवीन महाबळेश्वर हा प्रकल्पच बेकायदेशीर आहे. तो सुरू करण्यापूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. पर्यावरण आघात अहवाल तयार करत जनसुनावणी घ्यावी लागते. परंतु अशी कोणतीही प्रक्रिया येथे झालेली नाही. या प्रकल्पात समाविष्ट २९५ गावांमधील १७५ गावे ही संवेदनशील क्षेत्रामध्ये येतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड, पर्यावरण आणि जैवविविधतेला हानी पोहोचवता येत नाही. मात्र, असे असताना डोंगर फोडणे ही गंभीर बाब आहे. शासनाने हा प्रकल्प बेकायदेशीररित्या पुढे नेऊ नये, अशी मागणी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ मधुकर बाचुलकर यांनी केली आहे.

दुर्गम कांदाटी खोरे पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. तिथे विकासकामाच्या नावाखाली जे उत्खनन सुरू आहे ते पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहे. संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच यापुढे स्थानिकांनीही जागृत राहण्याची गरज आहे. – अॅड. सुमंतीनी नुलकर, पर्यावरण अभ्यासक, सातारा

कांदाटी खोऱ्यातील अवैध उत्खननाबद्दलचे वृत्त धक्कादायक आहे. पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेल्या, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि जागतिक वारसा हक्क स्थळ यादीत असलेल्या या भागात असे डोंगर फोडणे अत्यंत गंभीर आहे. – डॉ. संदीप श्रोत्री, पर्यावरण अभ्यासक, सातारा

प्रस्तावित नवीन महाबळेश्वर प्रकल्पांतर्गत अहिर येथे अनधिकृतरीत्या डोंगर फोडून गौण खनिज काढल्याचे दिसून येत आहे. ही बाब गंभीर आहे. याबाबत वाईचे प्रांताधिकारी व महाबळेश्वरच्या तहसीलदारांना चौकशी करून आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामधील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. – संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा

Story img Loader