विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रताप्रकरणी निकाल सुनावल्यानंतर सर्वस्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनीही या निकालावर त्यांचं मत स्पष्ट केलं. आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपावर टीका केली आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा निकाल म्हणजे खोदा पहाड आणि निकला चुहा. ही अपात्रतेची लढाई होती, मग सर्वच पात्र ठरले तर लढाई कशावरून झाली? सातत्याने संविधानाचा अपमान, संविधानाची चेष्टा आणि हत्या होताना दिसतेय. पोरखेळ करून ठेवला आहे. पक्ष फोडा, घरे फोडा, कोर्ट केसेस द्या. सगळ्यांनाच पात्र केलं. मग ही केस केलीच कशाला? त्यामुळे मला असं वाटतंय की सरकार संभ्रमात आहे. महाराष्ट्राच्या नागरिकांना ट्रिपल इंजिन सरकार मान्य नाही.
हेही वाचा >> ‘म्हणून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं नाही’, निकालानंतर राहुल नार्वेकर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात सातत्याने संभ्रमाचं वातावरण
“पक्ष कोणाचा, उद्धव ठाकरेंचा. तुम्ही कितीही नाही म्हटलात तरी हा पक्ष उद्धवजींचाच आहे. बाळासाहेब ठाकरेंनीही शुन्यातून निर्माण केली. बाळासाहेब हयात असताना उद्धव ठाकरेंना नेता केला आणि जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांच्याच नेतृत्त्वाखाली हे आमदार होते. ठाकरेंच्या बॅनरवरच आमदार झाले आहेत. महाराष्ट्रात अखंडपणे संभ्रम आणि गोंधळ सुरू आहे. यात महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होतंय. सावळा गोंधळ आणि अस्थिर वातावरण होतंय. हे गलिच्छ राजकारण आहे. याचा मी जाहीर निषेध करते”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मार्कलिस्ट एकत्र करून पास झालेलं सरकार
“माझी या सरकारकडून काहीच अपेक्षा नाही. हे सरकार कॉपी करून पास होणारं सरकार आहे. १०५ आमदार असलेल्यांना मागच्या बाकावर बसवलं, ४० आमदार वाल्याला मुख्यमंत्री केलंय. त्यामुळे एकमेकांचं मार्कलिस्ट एकत्र करून पास झालेलं हे सरकार आहे. ट्रिपल इंजिन खोके सरकारचा हा पॉलिसी परालिसीसचा हा निर्णय आहे”, अशी टीकाही सुळेंनी केली.
“आमदार अपात्रतेबाबत त्यांना निर्णय द्यायचा नव्हता. सर्वोच्च न्यायलायने तारीख दिली नसती तर यांनी निर्णय घेतलाच नसता. महाराष्ट्राला न्याय देण्याचं काम सर्वोच्च न्यायालायने केलं. आम्हाला फार अपेक्षा नव्हती. महाराष्ट्र छत्रपती, शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे. यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. अशा सुसंस्कृत महाराष्ट्रात असे निर्णय होत आहेत, दुर्दैव आहे की ते संविधान पाहत नाहीत. कॅबिनेटमध्ये गँगवॉर चालते हे दिसायला लागलं आहे. नुकसान कष्ट करणाऱ्या मराठी माणसाचं आहे”, असंही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा म्हटलं होतं की त्यांच्या मागे अदृश्य शक्ती आहे. परंतु, ही अदृश्य शक्ती संभ्रमात आहे. महाराष्ट्राला कमी लेखायचं काम सुरू आहे. महाराष्ट्रातलं नेतृत्त्व विरोधी पक्षातील नेते म्हणजे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार असो. किंवा देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी असो. दिल्लीत असा एकही महाराष्ट्राचा नेता नाही ज्याचा ऐकला जातो. महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य आहे, पण त्यांचे अधिकार काढून त्यांची शक्ती कमी करण्याचं काम ही अदृश्य शक्ती करते आहे”, असाही पलटवार त्यांनी केली.
तसंच, मराठी माणसांचा निर्णय इंग्रजीत वाचत होते. मुंबईत ही सुनावणी सुरू असतानाही त्यांनी इंग्रजीतून वाचन केलं, असाही टोला त्यांनी लगावला.