जालन्यातील रेल्वेच्या कार्यक्रमात सर्वपक्षीयांची टोलेबाजी
लक्ष्मण राऊत
जालना : जालना- मुदखेड-मनमाड रेल्वे मार्ग विद्युतीकरण कामाच्या शुभारंभासाठी गेल्या शनिवारी जालना येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या प्रमुख नेत्यांच्या भाषणामुळे काँग्रेसचे स्थानिक आमदार कैलास गोरंटय़ाल आणि भाजपचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवळीकीची चर्चा पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्याला कारण ठरले आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोरंटय़ाल यांच्या वक्तव्यात आलेला ‘हाथ में कमल’ असा उल्लेख आणि त्यानंतर त्यांना थेट भाजप प्रवेशासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलेले आमंत्रण!.
जालना येथे रेल्वे विभागाचा कार्यक्रम असला की दानवे त्या खात्याचे राज्यमंत्री असल्याने त्यावर भाजपचा प्रभाव असणे हे आता इतर पक्षीयांच्याही अंगवळणी पडल्यासारखे होत आहे. जालना शहराच्या विकासासाठी रावसाहेब दानवे यांनी केलेल्या सहकार्याचा उल्लेख करून गोरंटय़ाल म्हणाले, आपण कोणत्याही पक्षाचे असो, ते आपले मित्र आणि चांगले काम करणारे आहेत. दानवेंमुळे झालेल्या विकासकामांची यादीही त्यांनी दिली. त्यांच्यानंतर बोलताना भाजपचे जालना जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी सांगितले की, गोरंटय़ाल काँग्रेस पक्षाचे असले तरी शहराच्या विकासासाठी आम्ही सोबत आहोत. आमदार संतोष दानवे यांच्या या वक्तव्यास संदर्भ होता रावसाहेब दानवे यांनी शहरातील रस्त्यांसाठी आणलेल्या निधीस गोरंटय़ाल यांच्या आधिपत्याखालील नगर परिषदेने दिलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राचा!.
आमदार संतोष दानवे यांनी आपल्या भाषणात गोरंटय़ाल यांचे स्वागत केले. परंतु त्यांना भाजप प्रवेशाचे आमंत्रण मात्र दिले नाही. ते काम केले केंद्रीय अर्थराज्यमंत्री असलेले औरंगाबाद येथील डॉ. भागवत कराड यांनी. त्यामुळे जालना जिल्ह्यातील भाजपचे सर्वोच्च नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत डॉ. कराड यांनी गोरंटय़ाल यांना दिलेल्या आमंत्रणामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या!
रावसाहेब दानवे आणि गोरंटय़ाल यांची जवळीक जालना जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात लपून राहिलेली नाही. परंतु आपल्याच खात्याच्या शासकीय कार्यक्रमात राजकीय किंवा पक्षीय पातळीवर असे वक्तव्य करू नये एवढी जाणीव रावसाहेब दानवे यांच्याकडे आहे. त्यामुळे डॉ. कराड यांनी गोरंटय़ाल यांना भाजप प्रवेशासाठी दिलेल्या आमंत्रणाचा त्यांनी दुरान्वयेही उल्लेख केला नाही. परंतु लोकसभेवर सलग पाच वेळेस निवडून दिले म्हणून जिल्ह्यातील रेल्वेविषयक मागण्यांकडे लक्ष देणार असल्याचे सांगतानाच व्यासपीठावरील आमदार गोरंटय़ाल यांना उद्देशून ते म्हणाले, ‘तुम्ही जाणताच हात में कमल है!’ त्याच वेळी दानवे यांनी राज्यातील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ५० टक्के खर्चाची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे सांगून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला!
आमदार गोरंटय़ाल यांनी आपल्या भाजप प्रवेशाबाबत स्पष्ट शब्दांत इन्कार केला. आपण काँग्रेसमध्येच आहोत आणि पुढेही राहणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, विविध पक्षांचे नेते उपस्थित असताना कुणी काही म्हणाले असेल तर त्याचा अर्थ आपण काँग्रेस पक्ष सोडणार असा होत नाही. रावसाहेब दानवे भाजपचे आणि आपण काँग्रेसचे असलो तरी त्यांनी जालना शहराच्या विकासाकरिता निधी तसेच काही प्रकल्प आणले हे सत्य आहे. जालना शहराचा विकास व्हावा ही आपली भूमिका आहे. आपण तीन वेळेस काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर निवडून आलेलो आहोत. आपण काँग्रेस पक्षातच राहणार आहोत.
दानवे आणि जालना विधानसभा मतदारसंघ
मागील पाच निवडणुकांत जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे भाजपकडून सलग पाच वेळेस निवडून आलेले आहेत. यापैकी २००९च्या निवडणुकीचा अपवाद वगळला तर अन्य चारही निवडणुकांत जालना विधानसभा क्षेत्रात दानवे यांना काँग्रेस उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळालेली आहेत. लोकसभा निवडणुकीत सलग पाच वेळा निवडून येण्याच्या आधी रावसाहेब दानवे सलग दोन वेळेस भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. आता त्यांचे पुत्र संतोष दानवे सलग दोन वेळेस भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.
आपण काँग्रेसचेच – गोरंटय़ाल
काँग्रेसच्या हातात भाजपचे कमळ असल्याची चर्चा जालना विधानसभा मतदारसंघात नवी नाही. हा उल्लेख राजकीय चर्चेत नेहमी होत असतो. या संदर्भात आमदार कैलास गोरंटय़ाल यांचे म्हणणे असे की, १९९९ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वर्षी झाल्या होत्या. त्या वेळी रावसाहेब दानवे प्रथमच लोकसभेवर तर आपणही प्रथमच विधानसभेत निवडून गेलो होतो. त्या वेळी लोकसभेसाठी दानवेंना आणि विधानसभेसाठी आपणास मतदान करणाऱ्यांपैकी काहींनी ‘हाथ में कमल’ असा शब्दप्रयोग केला होता. काहीही चर्चा असली तरी आपण काँग्रेसचेच असून काँग्रेसमध्येच राहणार आहोत.