सन १९७१ च्या बांगलादेश मुक्ती लढय़ात भारतीय सेनेने पाकिस्तानवर मिळवलेल्या निर्णायक विजयाप्रित्यर्थ कराडमध्ये गेल्या २४ वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या विजय दिवस समारोहाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्तच्या सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, खासदार शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती विजय दिवस समारोह समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त कर्नल संभाजीराव कणसे – पाटील यांनी दिली.आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा- राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा कार्यकर्त्यांना नव्हता थांगपत्ता; सिंधुदुर्ग जिल्ह्याची मनसे कार्यकारिणी बरखास्त

कणसे – पाटील म्हणाले की, विजय दिवस समारोह समितीतर्फे १३ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता शोभा यात्रा निघेल. त्यामध्ये शहर परिसरातील शाळा, महाविद्यालयांचे चित्ररथ सहभागी होतील. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चित्ररथ केला जाणार आहे. एसजीएम कॉलेजच्या वुमन्स मिल्ट्री अ‍ॅकॅडमीचाही चित्ररथ असेल. याच दिवशी रात्री स्थानिक कलाकारांचा विशेष कार्यक्रम होईल. दि. १४ डिसेंबरला सकाळी यशवंतराव चव्हाण समाधी परिसरातील बागेत चित्रकला स्पर्धा अन् त्यानंतर लगेचच रक्तदान शिबीर होईल. दुपारी एक वाजता सातारा, सांगली जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचे संमेलन होईल. त्यास सैन्यदलाचे अधिकारी, स्थानिक प्रशासन उपस्थित राहील. यंदा वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा विशेष सन्मान याप्रसंगी होईल.

हेही वाचा- ‘जत तालुक्यातील ६५ गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ सिंचन योजना दीड वर्षात पूर्ण करणार’; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

कराड शहरातून १५ डिसेंबरला सकाळी एकत्मता दौड काढण्यात येईल. त्यात चार हजार विद्यार्थी, नागरीक, सैन्यदलाचे जवान सहभागी होतील. सायंकाळी सहा वाजता जीवन गौरव यशवंत पुरस्काराचे वितरण होईल. त्याच कार्यक्रमात साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांचा विजय दिवस समतीतर्फे विशेष सत्कार करण्यात येईल. १६ डिसेंबर या समारोहाच्या मुख्य दिवशी कराड तालुक्यातील तळबीडमध्ये हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी समितीतर्फे कोल्हापुरचे शाहु महाराज, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, ब्रिगेडीयर जेम्स थॉमस अभिवादन करतील. दुपारी अडीच ते साडेपाच वाजेपर्यंत समारोहाचा मुख्य सोहळा छत्रपती शिवाजी स्टेडियमवर होईल. त्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांना उपस्थितीसंदर्भात निमंत्रण देण्यात आले आहे.

Story img Loader