प्रसिद्ध मर्सिडीज बेंझ कंपनीचे भारतातील उपाध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स) सुहास कडलसकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी चाकण येथे भेट घेऊन कंपनीचा नगरच्या एमआयडीसीमध्ये प्रकल्प उभारणीसाठी साकडे घातले. कंपनी भविष्यासाठी या प्रस्तावाचा निश्चितच विचार करेल, असे आश्वासन कडलसकर यांनी युवक पदाधिकाऱ्यांच्या या शिष्टमंडळास दिले.
युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर काळे यांनी संघटनेच्या माध्यमातून ‘बेरोजगारी हटाव’चा नारा देत, नगरच्या एमआयडीसीत मोठे उद्योग यावेत यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक नामांकित व मोठय़ा उद्योगांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. जनरल मोटर्स, वोक्स व्ॉगन, टाटा या कंपन्यांशी त्यांनी पत्रव्यवहार केला. उद्योगपती राहुल बजाज यांच्याकडेही भेटीची वेळ मागितली आहे.
याच मोहिमेत त्यांनी मर्सिडीज बेंझ कंपनीचे उपाध्यक्ष कडलसकर यांची चाकण येथे भेट घेतली. कडलसकर यांनीही शिष्टमंडळास तब्बल २५ मिनिटे वेळ देऊन चर्चा केली. नगरमधील युवक उच्चशिक्षित आहेत, त्यांच्याकडे कौशल्य आहे, मेहनत करण्याची तयारी आहे. परंतु नगरच्या एमआयडीसीत मोठे उद्योग सुरू होत नसल्याने शहरात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. कंपनीने नगरमध्ये प्रकल्प उभारल्यास नगरमधील तरुणांना पुणे, मुंबईत निर्वासित होण्याची वेळ येणार नाही, लघुउद्योगांनाही चालना मिळेल असे आग्रही प्रतिपादन काळे यांनी या भेटीत कडलसकर यांच्याकडे केले. कंपनीने चाकण येथील प्रकल्पात स्थानिक तरुणांनाच प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे कडलसकर यांनी सांगितले.
नगरच्या औद्योगिक विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे योग्य ती मदत मागितली जाईल, तसेच औद्योगिक विकास महामंडळाकडे प्रकल्पांसाठी भूखंड उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
 राठोड यांना सवाल!
निव्वळ भावनिक राजकारण करणाऱ्या आमदार अनिल राठोड यांनी खरेतर हे काम करायला हवे होते, परंतु संरक्षणाचा आभास निर्माण करणाऱ्या राठोड यांनी गेल्या २५ वर्षांत एकाही उद्योजकाची, नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीच्या व्यवस्थापनाची भेट घेतली नाही की त्यांना नगरमध्ये येण्यासाठी निमंत्रित केले नाही. तथाकथित मोबाइल आमदार नगरकरांना संरक्षण दिल्याचा दावा करतात, त्यांनी नगरमध्ये प्रकल्प यावेत यासाठी पाठपुरावा का केला नाही, अशी टीका किरण काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. शिवाय अनेक चालू कंपन्या बंद का पाडल्या, अनेक कंपन्यांनी नगरला रामराम का ठोकला असे प्रश्न राठोड यांना विचारले आहेत.

Story img Loader