‘१२वी फेल’ चित्रपटात ज्यांचा जीवनपट मांडण्यात आला आहे, असे आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांना सेवेत महानिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीसंदर्भात मनोज शर्मा यांनी ‘एक्स’वरून माहिती दिली आहे. मनोज शर्मा यांच्या आयुष्यावर चित्रपट आल्यानंतर ते देशभरात चर्चेत आले होते. त्यांच्यावरील ‘१२ वी फेल’ हा चित्रपट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. मनोज शर्मा हे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असून सध्या ते महाराष्ट्र पोलीस दलात उपमहानिरीक्षक (डीआयजी) पदावर कार्यरत होते. मात्र, आता त्यांना महानिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.
केंद्र सरकारने २००३, २००४, २००५ बॅचच्या आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मनोज शर्मा यांचे नाव आहे. मनोज शर्मा यांनी यासंदर्भातील माहिती देताना ‘एक्स’वर म्हटले, “एसपी’पासून सुरू झालेला प्रवास आज ‘आयजी’ होण्यापर्यंत पोहोचला. या प्रदीर्घ प्रवासात साथ दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.” मनोज शर्मा यांनी याआधी महाराष्ट्रातील नागपूर, कोल्हापूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर तसेच मुंबईसह विविध ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे.
हेही वाचा : सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ, श्रीनिवास पवार म्हणाले, “प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट..”
मनोज शर्मा हे मूळ मध्य प्रदेशातील असून ते बारावीच्या परीक्षेत हिंदी विषय वगळता बाकी सर्व विषयांमध्ये नापास झाले होते. मात्र, तरीही मनोज शर्मा यांचे आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. ते स्वप्न त्यांनी सत्यातदेखील उतरवले. मनोज शर्मा यांच्या या संघर्षावर ‘१२ वी फेल’ हा चित्रपट बनला आहे. केंद्र सरकारने ३० आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला. या ३० अधिकाऱ्यांच्या यादीत विविध केडरमधील अधिकाऱ्यांचा समावेश असून यामध्ये आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांचेदेखील नाव आहे.
चौथ्या प्रयत्नात झाले ‘आयपीएस’!
मनोज शर्मा यांनी चौथ्या प्रयत्नात ‘यूपीएससी’ परीक्षा पास केली. त्यांना तीनवेळा अपयश आले, पण त्यांनी खचून न जाता प्रयत्न चालू ठेवले. अखेर चौथ्या प्रयत्नात १२१ रँक मिळवून ते ‘आयपीएस’ अधिकारी झाले.