सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर तुडूंब भरलेल्या इरई धरणाचे तीन दरवाजे एक मिटरने उघडण्यात आले असून नदी काठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. तिकडे गडचिरोलीत पावसाची रिमझिम सुरूच असून अनेक गावात पाणी शिरले आहे. दरम्यान, रविवारी रात्री सिरोंचाजवळील करसपल्ली नाला येथे दोन जण वाहून गेले, तर दोन्ही जिल्ह्य़ात किमान ५०० घरांची पडझड झाली आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातही गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने धरणे तुडूंब भरली आहेत.
शनिवार व रविवारी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस झाला. एकटय़ा चंद्रपूर शहरात एकाच दिवशी २३८ मि.मी. पाऊस झाल्याने अनेक वस्त्या जलमय झाल्या होत्या. आज सकाळीही पावसाची रिमझिम सुरूच होती, परंतु गणेश विसर्जनाला सुरुवात होत नाही तोच दुपारी पावसाने उघडीप दिली, परंतु विक्रमी पावसाने चारगांव व इरई धरण तुडूंब भरल्याने धरणाचे तीन दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. दाताळा मार्गावरील इरई नदीच्या पुलापर्यंत पाणी आले असून हडस्ती व मार्डा मार्ग बंद आहे. वडगांव, सिस्टर कॉलनी, रहमतनगर या भागात पाणी आहे. पाऊस बंद असल्यामुळे पाणी कमी होत असले तरी नदीचे पाणी वस्त्यांमध्ये शिरले आहे. गोंडपिंपरी, ब्रम्हपुरी व बल्लारपूर तालुक्यातही पूर परिस्थिती आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी जिल्हाभरात किमान दोनशे घरांची पडझड झालेली आहे. अतिवृष्टीत सावली तालुक्यात ५७ घरे अंशत: तर ४ घरे पूर्णत: पडलेली आहेत. मूल तालुक्यात २३ घरे अंशत: व दोन घरे पूर्णत: पडली. गोंडपिंपरी तालुक्यात ६३ घरे अंशत: पडली. कोरपना तालुक्यात ईरई गावात एक घर अंशत: पडले. बल्लारपूर तालुक्यातील चोरी मक्ता गावात सात व्यक्ती पुरात अडकल्या होत्या. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. जिल्ह्य़ातील पूर परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे नदीच्या पात्रातील पाण्यात सतत वाढ होत आहे. एटापल्ली, आलापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी, धानोरा व चामोर्शी या भागातील शेकडो गावात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पर्लकोटा, दिना, इंद्रावती, कठाणी व खोब्रागडी या नद्या दुथडी भरून वाहत आहे. काही गावे अगदी नद्यांच्या काठावर असल्याने तेथे पूराचे पाणी वाढतच चालले आहे, तर सिरोंचा येथून जवळच असलेल्या कारसपल्ली नाल्यात टाटा सुमोसह एक जण वाहून गेला, तर याच मार्गावरील गोमनी नाल्यात एक जण वाहून गेला आहे. या दोघांचे मृतदेह अजून मिळाले नसून पथक शोध घेत आहे. गडचिरोलीचा रस्ता मोकळा असला तरी ग्रामीण भागातील काही रस्ते अजूनही बंदच आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेस सुध्दा अडकून पडल्या आहे. एटापल्ली, सिरोंचा येथे पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील शाळांमध्ये मुक्कामी असलेली कुटूंब घरी परतली आहेत. तर बहुतांश घरांची पडझड झाल्याने जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीची आकडेवारी घेण्यास सुरूवात केली आहे. या पावसामुळे लोकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी धानपट्टय़ात चांगला पाऊस झाल्याने भाताच्या पिकाला जीवदान मिळाले आहे. मुसळधार पावसामुळे सिंचन प्रकल्प सुध्दा आता भरण्यात सुरूवात झाली आहे. कालपर्यंत कोरडे ठणठणीत किंवा अध्रे भरलेले प्रकल्पात आज पाणी दिसत आहे. जिल्ह्य़ातील ११ लघु व मध्यम सिंचन प्रकल्पापैकी ४ सिंचन प्रकल्प तुडूंब भरले, तर अन्य सात प्रकल्पात ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा आहे. चंदई, चारगांव, लभानसराड व दिना प्रकल्प शंभर टक्क भरून ओव्हरफ्लो होत आहेत, तर आसोलामेंढा ७६.८५ टक्के, घोडाझरी ५१.३५, नलेश्वर ५९.१४, अंमलनाला ६२.८८, पकडीगुड्डम ५३.३२, डोंगरगांव ५७.८५ व इरई धरण ९३.२० टक्के भरले आहेत.
बुलढाणा जिल्ह्य़ातील धरणे तुडूंब
बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पहिल्यांदाच नदी नाले तुडूंब होत त्यांना पूर आले आहेत. जिल्ह्य़ातील खडकपूर्णा, पैनगंगा, ज्ञानगंगा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत, तर सिंचन प्रकल्प व जलाशयाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पैनगंगा नदीला पूर आल्याने मेहकरनजीकच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे चिखली-मेहकर रस्त्यावरील वाहतूक बराच काळ ठप्प होती. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारे येळगांव धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे बुलढाणा शहराला भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या संपुष्टात आली आहे. बुलढाणा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसात ११० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. विध्नहर्त्यांच्या आगमनासोबतच पावसाचे आगमन झाले. दहा दिवसात अतिशय समाधानकारक पाऊस पडला. या पावसाने विघ्नहर्त्यां श्री गणेशाने दुष्काळाचे विघ्न संपविले असून खरिप पिकांना संपूर्णपणे जीवदान मिळाले आहे. रब्बी पिकोंच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पावसाने राने आबादानी झाले असल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
कालपासून जिल्ह्य़ात संततधार पाऊस सुरू असल्याने देऊळगांवराजा नजीकच्या खडकपूर्णा धरणाचे सात दरवाजे उघडले असून त्यातून ३५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुरुंदकर यांनी दिली.
यवतमाळ – गेल्या ३-४ दिवसापासून जिल्ह्य़ात संततधार पाऊस सुरूच असून नद्यानाले दुथडी भरून वाहत असून सर्व धरण तलाव जलाशयात उदंड पाणी झाले आहे. शनिवारी रात्रभर जलधारा बरसल्या, तर रविवारी पूर्ण दिवसच पावसात गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक स्थानांवर वाहतूक टप्प झाल्याचे झाल्याचे वृत्त आहे. तब्बल दीड महिने दबा देऊा बसलेल्या वरुणदेवाने १५ दिवसात दमदार हजेरी लावली. श्रीगणेश व महालक्ष्मीवर तर पावसाची मेहरबानीच झाली. काल जिल्ह्य़ातील सरासरी २१.३३ मि.मी. होती. गेल्या आठवडय़ात पावसाने ३ दिवस विश्रांती घेतली तेवढीच. नंतर पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने दारव्हा व दिग्रस तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली आहे. काल झरीजामणी येथे सार्वजनिक ८५, तर वणी तालुक्यात ६५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
तीन तालुक्यात अतिवृष्टी
बुलढाणा जिल्ह्य़ात बुलढाणा येथे ११४ मि.मी. पाऊस झाला, तर सर्वात कमी लोणार येथे ५० मि.मी. झाला आहे. जिल्ह्य़ातील ११ तालुक्यात पडलेला पाऊस मिमीमध्ये चिखली ७० मि.मी., देऊळगावराजा ६२ मि.मी., मेहकर ९९ मि.मी., लोणार ५० मि.मी., सिंदखेडराजा ६४ मि.मी., श्ेागांव ५६ मि.मी., जळगाव जामोद ७६ मि.मी., तर संग्रामपूर ६४.४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात ९२१.५० मि.मी. एकूण पाऊस झाला त्याची टक्केवारी ७०.९३ अशी आहे.
चंद्रपुरात इरई धरणाचे दरवाजे उघडले
सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर तुडूंब भरलेल्या इरई धरणाचे तीन दरवाजे एक मिटरने उघडण्यात आले असून नदी काठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे.
First published on: 09-09-2014 at 07:58 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irai damp 4 doors are open