वाई : पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी बोगद्यात लाईटसाठी लावण्यात आलेला लोखंडी अँगल ट्रकवर कोसळून ट्रकमध्ये घुसल्याने माल ट्रकचे मोठे नुकसान झाले. यामुळे साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक खंडित झाली. वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या कित्येक किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. भुईंज (ता. वाई) महामार्ग पोलिसांनी बोगद्यातील वाहतूक बंद करून ती जुन्या खंबाटकी घाटाने वळवली. त्यामुळे खंबाटकी घाटातही वाहतूक कोंडी होऊन वाहतूक संथ झाली.
खंबाटकी बोगद्यात लाईट्साठी लावण्यात आलेला लोखंडी अँगल कोसळून पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रकच्या केबीनमध्येच घुसल्याने ट्रक चालक किरकोळ जखमी झाला. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताने बोगद्यात वाहतुक कोंडी झाली होती. वाहतूक बंद झाल्याने वाहनांच्या कित्येक किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
हेही वाचा : मिरचीपूड फेकून लूट, धुळे तालुक्यातील घटना
भुईंज महामार्ग पोलिसांनी बोगद्यातील वाहतूक बंद करून ती जुन्या खंबाटकी घाटाने वळवली. त्यामुळे घाटातील रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे घाटातही वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने बोगद्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. काही वेळाने वाहतूक पूर्ववत होईल, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे.