केंद्रीय विद्युत यंत्रणेतील दुरुस्ती आणि खासगी विद्युत प्रकल्पातील वीजपुरवठय़ात घट झाल्यामुळे राज्यात पुन्हा भारनियमन सुरू झाले आहे.
राज्याच्या एकूण गरजेपेक्षा सुमारे १६०० मेगाव्ॉट विजेची तूट सध्या निर्माण झाली असून, त्यामुळे भारनियमन अपरिहार्य झाल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय विद्युत यंत्रणेतील सिपत-बिलासपूर वाहिनीच्या दुरुस्तीचे काम निघाल्यामुळे सुमारे ३५० ते ५०० मेगाव्ॉट विजेची तूट निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अदानी विद्युत प्रकल्पातील ६६० मेगाव्ॉट क्षमतेचे दोन संच तांत्रिक कारणांमुळे अचानक बंद पडले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण सुमारे १६०० मेगाव्ॉटची टंचाई भासू लागली आहे. अशा परिस्थितीत भारनियमन अपरिहार्य झाले असल्याचे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील वीजबिलाची मोठी थकबाकी असलेला १५ टक्के भाग वगळता कोठेही भारनियमन राहिले नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच येथे पत्रकारांशी बोलताना केला होता. त्यानंतर थोडय़ाच दिवसांनी हा प्रकार घडला आहे. वीजवाहिनीतील बिघाड छत्तीसगड राज्यात झाला असल्यामुळे आणि अदानी प्रकल्प खासगी असल्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत होण्यास किती काळ लागेल, हे सांगणे अवघड असल्याचे महावितरणच्या प्रवक्त्याने नमूद केले. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या काळात भारनियमन न करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणावरही पाणी फिरले आहे.

Story img Loader