Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहेत. एका अल्पवयीन चालकाला वाचवण्याकरता संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती, हे यातून निष्पन्न होतंय. या प्रशासकीय यंत्रणेला सरकारचं पाठबळ असल्याचा आरोपही केला जातोय. त्यामुळे या प्रकरणात सरकारलाच आरोपी करा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ही मागणी करण्यात आली आहे.
“पुण्यातील ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरण दाबून टाकण्यासाठी सत्ताधारी आणि सरकारी यंत्रणा किती भयंकर प्रताप करीत आहे, हे रोज चव्हाट्यावर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बिल्डर पुत्राच्या रक्ताच्या नमुन्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी फेरफार केल्याचा आणि ते नमुने थेट कचरा कुंडीत फेकून दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेले नाही. अटकेत असलेल्या डॉ. तावरे याने ‘मी सगळ्यांची नावे जाहीर करीन’ अशी धमकीच दिली आहे. स्वतः आरोपी असलेला डॉ. तावरे एवढ्या खुलेपणाने धमकी देतो म्हणजेच या प्रकरणातील ‘अप्रत्यक्ष सह-आरोपीं’चे शेपूट आणखी बरेच लांबू शकते. असाच या धमकीचा अर्थ आहे”, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.
हेही वाचा >> Porsche Accident: “अल्पवयीन मुलगा सांगत होता हवे तेवढे पैसे घ्या आणि मला..”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
“या प्रकरणातील आरोपी असोत, त्यांना वाचविण्याचा आटापिटा करणारी सरकारी-पोलीस यंत्रणा असो की या सगळ्यांचे सत्तेच्या पडद्यामागचे सूत्रधार, ही सगळी मंडळी भ्रष्टच नाहीत, तर ‘रक्तालाही चटावलेली’ आहेत. आरोपीच्या रक्ताचे नमुने कचरा कुंडीत फेकणाऱ्यांना दुसरे काय म्हणणार? पुण्याचे ससून रुग्णालय हे ‘गुन्हेगारांना वाचविणारा अड्डा’ बनले आहे आणि राज्याचा आरोग्य विभाग भ्रष्टाचार आणि खाबूगिरीच्या आरोपांनी पुरता बदनाम झाला आहे”, अशी टीका ठाकरे गटाने केली.
ससून रुग्णालयातील अमानुष भ्रष्टाचाराची भर
“जनतेचे आरोग्य सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी आरोग्य विभागावर असते. मात्र विद्यमान आरोग्य मंत्र्यांना जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही. अनियमित बदल्या-बढत्या आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढाल हा आरोग्य विभागातील मोठा उद्योग बनला आहे. महात्मा जोतिराव फुले योजनेतील बेकायदेशीर कामांवरून आरोप झाले. रुग्णवाहिका खरेदीमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा, कंत्राटी कामगार भरतीच्या नावाखाली ३२०० कोटी रुपयांच्या ‘टेंडर’ची खाबूगिरी, असे आरोग्य खात्याच्या भ्रष्ट कारभाराचे नमुने आतापर्यंत बाहेर आले आहेत. त्यात ससून रुग्णालयातील अमानुष भ्रष्टाचाराची भर पडली”, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
हेही वाचा >> अग्रलेख : सुसंस्कृतांची झोपडपट्टी!
राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’ भ्रष्टाचार चव्हाट्यावर
“पुणे ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाने ससून रुग्णालय किंवा आरोग्य विभागच नव्हे, तर राज्यकर्त्यांचा ‘रक्ताळलेला’ भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे. तपासातील सुरुवातीपासूनचे गडबड-घोटाळे, त्यातील राजकीय हस्तक्षेपांची झालेली पोलखोल, आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकण्याचा प्रकार आणि या प्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीची सूत्रे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अधिकाऱ्याकडेच सोपविणे हे सगळेच भयंकर आहे. गुन्हा केल्याने आरोपी तर गुन्हेगार आहेतच, परंतु त्यांच्या बचावासाठी आटापिटा करणारी सरकारी यंत्रणा आणि सरकारमधील त्यांचे पोशिंदेदेखील गुन्हेगारच ठरतात. मिलॉर्ड, या प्रकरणात सरकारलाच आरोपी करा!”, अशी मागणीच ठाकरे गटाने केली आहे.